रामनवमी उत्सवामुळे चाकण-भोसरी-चिखलीत वाहतुकीत मोठे बदल...
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड चाकण
रामनवमी निमित्त पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी (दि. २६ मार्च) मोठ्या उत्साहात मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले असून, काही प्रमुख मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.
वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १० ते रात्री १० या कालावधीत अनेक मुख्य रस्त्यांवर सर्वसामान्य वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे.
भोसरी परिसरातील बदल...
भोसरीतील हरिओम स्वीट चौक ते दिघी रोड आणि दिघी चौक ते दिघी रोड हा मार्ग पूर्णपणे बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहतूक आळंदी रोड मार्गे वळवण्यात येणार आहे.
चाकण परिसरातील बदल
चाकणमधील चाकण चौक, महात्मा फुले चौक, नेहरू चौक, आंबेठाण चौक आणि मार्केट यार्ड परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित असल्याने येथील वाहतूक परिस्थितीनुसार पर्यायी मार्गांवर वळवण्यात येणार आहे.
अत्यावश्यक सेवांना सूट...
मिरवणुकीत सहभागी वाहने तसेच रुग्णवाहिका यांसारख्या अत्यावश्यक सेवांना या निर्बंधांतून वगळण्यात आले आहे. इतर सर्व खाजगी व सार्वजनिक वाहनांना मात्र या मार्गांवर प्रवेश दिला जाणार नाही.
पोलिसांचे आवाहन...
उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य चौकांमध्ये दिवसभर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी:
शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा
वाहतूक नियमांचे पालन करावे
पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे