बिबट्याच्या दहशतीने पालखेडकर हैरान, नागरिकांकडून बंदोबस्त करण्याची मागणी...

बिबट्याच्या दहशतीने पालखेडकर हैरान, नागरिकांकडून बंदोबस्त करण्याची मागणी...

NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्याने; नागरिकांमध्ये दिवसेंदिवस बिबट्याची दहशत वाढत असून, या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी पालखेड येथील नागरिकांनी केली आहे. पालखेड गावातील एका मजुराच्या सहाशेळ्या या बिबट्याने मारून टाकल्याने एकच खळबळ उडाली होती.

त्यानंतर पप्पू सय्यद, शामराव गायकवाड, गोविंद लोणारे या शेतकऱ्यांच्या गाईंवर या बिबट्याने हल्ला करून मारून टाकले आहे. याशिवाय अनेक शेतकऱ्यांचे पाळीव कुत्रे देखील या बिबट्याने फस्त केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मारुती फाटा, पालखेड कॉलनी, खडक सुक्याने आधी परिसरात या बिबट्यांचा वावर असल्याचे बोलले जात आहे. मात्र अजूनही या बिबट्याचा बंदोबस्त होत नसल्याने; नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

रात्री अपरात्री पहाटे हे बिबटे नागरिकांना दिसत असल्याने; वाडीवस्तीवर राहणारे नागरिक या बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या गाई मारून टाकल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. संबंधित खात्याचे अधिकारी या ठिकाणी येऊन पंचनामे करून जातात मात्र अजूनही या शेतकऱ्यांना भरपाई मिळत नसल्याने, शेतकऱ्यांनी करायचे काय असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. अनेक वेळा तक्रार करूनही याकडे संबंधित खाते दुर्लक्ष करीत असल्याने याला जबाबदार कोण अशी म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. 

 या बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण होत आहे परिसरात कोराटे, पिंपळगाव केतकी, पालखेड कॉलनी, खडक सुक्याने या ठिकाणी हे बिबटे नागरिकांना दर्शन देत आहे. मात्र अजूनही याचा बंदोबस्त केला जात नसल्याने या बिबट्यांमुळे जीवित हानी होण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याने संबंधित खात्याने याचा त्वरित बंदोबस्त करावा; याशिवाय नवीन कर्मचारी यांची भरती करून कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी व यावर उपाययोजना म्हणून त्वरित पिंजरे उपलब्ध करून या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पालखेड व परिसरातील नागरिकांनी केली आहे.