राजगुरुनगरमध्ये शेतजमिनीच्या वादातून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू; पाच जणांवर खुनाचा गुन्हा...

राजगुरुनगरमध्ये शेतजमिनीच्या वादातून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू; पाच जणांवर खुनाचा गुन्हा...

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड,खेड 

खेड तालुक्यातील भांबुरवाडी येथे शेतजमिनीच्या वादातून एका वृद्ध शेतकरी दांपत्यावर झालेल्या अमानुष मारहाणीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सोपान तुकाराम भांबुरे (वय 75) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, राजगुरुनगर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (3 मार्च 2026) दुपारी सुमारे 3:45 वाजण्याच्या सुमारास भांबुरवाडी येथील ‘दरा’ नावाच्या शेतात घडली. सोपान भांबुरे आणि त्यांची पत्नी चंद्रकला भांबुरे (वय 58) शेतात असताना त्यांचा मुलगा रामदास शेतातून गुरे घरी नेण्यासाठी गेला होता.

त्याचवेळी आरोपींनी संगनमत करून शेतात प्रवेश केला आणि “तुम्ही या शेतात यायचे नाही” असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर पुढे हिंसक हाणामारीत झाले.

आरोपींनी सोपान भांबुरे आणि चंद्रकला भांबुरे यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सोपान भांबुरे जमिनीवर कोसळल्यानंतरही त्यांच्या छातीवर प्रहार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या मारहाणीमुळे त्यांना चक्कर येऊन ते गंभीर जखमी झाले.

त्यांना तत्काळ प्रथम धन्वंतरी हॉस्पिटल (राखेवाडी) येथे आणि त्यानंतर राजगुरुनगर येथील गवडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

या प्रकरणी मृताच्या पत्नी चंद्रकला भांबुरे यांनी राजगुरुनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) अंतर्गत पाच आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींची नावे पुढीलप्रमाणे :

शिवाजी पांडुरंग भांबुरे

किरण शिवाजी भांबुरे

आशा सुभाष भांबुरे

सोनाली किरण भांबुरे

 अरुणा शिवाजी भांबुरे

(सर्व रा. दोरे भांबुरवाडी, ता. खेड)

राजगुरुनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिसोदे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, शेतजमिनीच्या किरकोळ वादातून थेट जीवितहानी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.