चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; आत्महत्येचा बनाव रचणाऱ्या पतीला जुन्नर पोलिसांकडून अटक...
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड, जुन्नर
जुन्नर तालुक्यातील निमगावतर्फे म्हाळुंगे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी पती नवनाथ बाजीराव पारखे (वय ४२) याला जुन्नर पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पत्नीचा खून केल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनेची माहिती मिळताच जुन्नर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सखोल तपास सुरू केला. प्राथमिक पाहणीतच पोलिसांना संशय आल्याने आरोपी नवनाथ पारखे याची कसून चौकशी करण्यात आली.
पोलिसांच्या चौकशीत आरोपीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर जुन्नर पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
या घटनेमुळे निमगावतर्फे म्हाळुंगे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. जुन्नर पोलीस पुढील तपास करत आहेत.