राज्यात बंदी असतानाही पुणे–पिंपरी चिंचवडमध्ये गुटख्याची खुलेआम विक्री; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
राज्यात गुटखा विक्रीवर कडक बंदी असतानाही पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दिवसाढवळ्या गुटख्याची खुलेआम विक्री होत असल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. शहरातील विविध भागांतील पानटपऱ्यांवर प्रतिबंधित गुटखा सहज उपलब्ध होत असल्याचे दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तस्करीचे जाळे सक्रिय?
मिळालेल्या माहितीनुसार, सीमावर्ती भागातून मोठ्या ट्रकद्वारे गुटखा शहरात आणला जातो आणि त्यानंतर छोट्या वाहनांतून विविध भागांत त्याचे वितरण केले जाते. या साखळीत तीन ते चार प्रमुख व्यावसायिकांचा सहभाग असल्याची चर्चा असून, त्यांच्या हालचालींबाबत संबंधित यंत्रणांकडे माहिती असूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे.
छापे की केवळ कागदी कारवाई?
शहरात गुटख्याची वाहतूक, साठवणूक आणि विक्री निर्भयपणे सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. बंदी असतानाही विक्री सुरू राहिल्याने पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. केवळ छापे टाकून किंवा किरकोळ कारवाई करून कागदोपत्री तपशील दाखवला जातो, मात्र मोठ्या साखळीवर कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
आयुक्तांची कठोर भूमिका गरजेची
शहरातील ८० ते ९० टक्के गुटखा पानटपऱ्यांमधून विकला जात असल्याचा दावा आहे. त्यामुळे विक्रीवर आळा घालायचा असल्यास टपऱ्यांवर सातत्याने आणि कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिस आयुक्तांनी ठोस आणि निर्णायक भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित विभागांकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसून, प्रशासन नेमकी कोणती पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.