चाकण मध्ये अल्पवयीन मुलाकडून बेकायदा पिस्तूल हस्तगत पोलिसांची धडक कारवाई...
प्रतिनिधी :-विश्वनाथ केसवड चाकण
चाकणजवळील खराबवाडी परिसरात कायदा-सुव्यवस्थेला धक्का देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या अल्पवयातच हातात पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एका मुलाला पोलिसांनी रंगेहात पकडत मुसक्या आवळल्या. सोमवारी (२० एप्रिल) दुपारी दोन वाजताच्या सुमारास सारा सिटी परिसरात ही थरारक कारवाई करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार, संशयित हालचालींमुळे पोलिसांनी अल्पवयीनाची झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे २६ हजार रुपये किमतीचे सिल्व्हर रंगाचे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पोलीस अंमलदार राजकुमार दामोदर हनुमंते यांनी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, अल्पवयीनाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात आली आहे.
सध्या दक्षिण महाळुंगे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या अल्पवयीनाकडे शस्त्र कसे आले? यामागे कोणाचा हात आहे का? याचा शोध घेतला जात आहे.