चाकण आणि परिसरात अल्पवयीन गुन्हेगारांचा कहर - पाच वर्षांत १२ खून...
प्रतिनिधी - विश्वनाथ केसवड, चाकण
चाकण औद्योगिक पट्ट्यात अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारी प्रवृत्ती चिंताजनकरीत्या वाढत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. गेल्या पाच वर्षांत १४ ते १८ वयोगटातील मुलांकडून तब्बल १२ खून झाल्याची माहिती उघड झाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
टोळ्या, सोशल मीडियातून दहशत
अल्पवयीन मुलांनी टोळ्या तयार करून प्रतिस्पर्धी गटांवर हल्ले करण्याचे प्रकार वाढले आहेत. मोबाईल, सोशल मीडिया, इंस्टा रील्स, स्टेटस आणि व्हिडीओंच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे दिसून येते. किरकोळ वादातून टोळ्या तयार करून थेट शस्त्रांचा वापर करण्यापर्यंत मजल जात आहे.
महाळुंगे-चाकण परिसरात वाढती गुन्हेगारी
चाकण आणि महाळुंगे परिसरात शस्त्रांचा वापर, वाहनांची तोडफोड, समाजमाध्यमांवरून धमक्या देणे अशा गंभीर घटनांमध्ये वाढ झाली आहे. औद्योगिक वसाहतीमुळे पालक कामानिमित्त बाहेर असल्याने मुलांवर देखरेखीचा अभाव हे प्रमुख कारण मानले जात आहे.
पालकांची भूमिका महत्त्वाची
कुटुंबातील संवादाचा अभाव, योग्य मार्गदर्शन न मिळणे, वाढते व्यसनाधीनतेचे प्रमाण यामुळे अल्पवयीन मुलं चुकीच्या मार्गाला लागत असल्याचे चित्र आहे. पालकांनी मुलांच्या हालचालींवर आणि सोशल मीडियावरील वापरावर लक्ष ठेवण्याची गरज अधोरेखित होत आहे.
पोलिसांचे म्हणणे काय?
अल्पवयीन आरोपींना अटक न करता ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवले जाते. त्यांची सुटका लवकर होत असल्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढते, असे सांगितले जात असले तरी पोलिसांकडून नियंत्रणासाठी मार्गदर्शन आणि जनजागृती मोहिमा राबवल्या जात असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी स्पष्ट केले.