पोलीस उपनिरीक्षक किशन भोईर यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप; २१ बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना
प्रतिनिधी : सुमित पाटील पालघर–मनोर,
ठाणे शहरात कर्तव्य बजावत असताना गावगुंडाच्या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक किशन भोईर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पोलीस दलासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रात्रीच्या वेळी अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्यात आला. यावेळी झालेल्या झटापटीत पोलीस उपनिरीक्षक किशन भोईर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी राजू वाल्मिकी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, आज पोलीस उपनिरीक्षक किशन भोईर यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धुकटन संख्ये पाडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी पोलीस दलाच्या वतीने शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. पोलिसांनी २१ बंदुकीच्या फैरी झाडून वीरमरण आलेल्या किशन भोईर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
किशन भोईर यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावातही शोककळा पसरली आहे. कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या या पोलीस अधिकाऱ्याला शासकीय इतमामात देण्यात आलेला अखेरचा निरोप अत्यंत भावूक वातावरणात पार पडला. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले.
vishwanathkeswad