वन्यजीव संरक्षणासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या ४० हून अधिक सर्पमित्रांच्या कार्याचा गौरव; पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार

वन्यजीव संरक्षणासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या ४० हून अधिक सर्पमित्रांच्या कार्याचा गौरव; पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड चाकण,

 चाकण : वन्यजीवांचे संरक्षण, सर्पबचाव, आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या सर्पमित्र, वन आपदा मित्र आणि रेस्क्यू टीम सदस्यांचा सन्मान सोहळा वनपरिक्षेत्र जुन्नर व वनविभाग चाकण येथील अधिकारी आणि कर्मचारीवृंद यांच्या वतीने उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या सोहळ्यात ४० हून अधिक स्वयंप्रेरणेने कार्य करणाऱ्या सर्पमित्र व वन्यजीव बचाव पथकातील सदस्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.

मात्र, या कार्यक्रमादरम्यान नानांच्या निधनाची दुःखद बातमी समोर आल्याने उपस्थितांच्या मनात शोकभावना होती. पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने दुःखद वातावरणातही सन्मान सोहळा नियोजनानुसार पार पडला.

२००४ पासून सुरू झालेल्या चळवळीचा प्रेरणादायी प्रवास

वसुंधरा बहुउद्देशीय संस्थेच्या स्थापनेपासून म्हणजेच २००४-०५ पासून सर्पमित्रांच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला सुरुवात झाली. गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्पमित्रांनी सर्पबचाव, वन्यजीव संरक्षण आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

वन्यजीवांचे संरक्षण करताना नागरिकांची सुरक्षितता जपणे आणि निसर्गातील जैवविविधतेचे संवर्धन करणे, या उद्देशाने सर्पमित्र, वन आपदा मित्र व रेस्क्यू टीम सदस्य कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आयोजित करण्यात आलेल्या सन्मान सोहळ्यात ४० हून अधिक सदस्यांचा गौरव करण्यात आला.

वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक व्हावी, तसेच स्वयंसेवकांना त्यांच्या कार्यासाठी प्रोत्साहन मिळावे, हा या सन्मान सोहळ्यामागील प्रमुख उद्देश होता.