आता अभ्यास करावाच लागणार, ढकलपास पद्धत बंद.! पहिली ते 8 वी'तील गुणवत्ता नसेलेले विद्यार्थी होणार नापास...

आता अभ्यास करावाच लागणार, ढकलपास पद्धत बंद.! पहिली ते 8 वी'तील गुणवत्ता नसेलेले विद्यार्थी होणार नापास...

NEWS15 मराठी रिपोर्ट - पुणे

मागील काही वर्षांपासून चालत आलेली ढकलपास पद्धत आता बंद होणार आहे. इयत्ता पहिली ते आठवीची परीक्षा होणार असून, यात गुणवत्ता नसेल तर अशा विद्यार्थ्याला नापास करण्यात येणार आहे. मात्र, त्याचा पुरवणी परीक्षा देऊन पास होण्याची संधी देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलीय.

इयत्ता 1 ली ते 8 वीची परीक्षा होणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चालढकल होत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाचे टेन्शन नव्हते. मात्र आता त्यांना पास होण्यासाठी अभ्यास करणे आवश्यक आहे. अन्यथा त्याच वर्गात बसावं लागणार आहे. 

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या (आरटीई) कायद्यानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्याच्या परीक्षा घेतल्या जात होत्या. परंतु विद्यार्थ्यांना नापास मात्र करता येत नव्हते. आता नवीन शासन निर्णयानुसार विद्यार्थी गुणवत्तेत कमी पडला तर त्याला नापास करावेच लागेल. म्हणजेच विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात ढकलणे बंद होणार आहे. जर विद्यार्थी नापास झाला असेल तर त्याला जूनमध्ये पुन्हा पुरवणी परीक्षा देता येणार आहे.पाचवी ते आठवीसाठी एप्रिलमध्ये परीक्षा होईल. पाचवी व सहावीसाठी भाषा, गणित व परिसर अभ्यास तर सातवी, आठवीसाठी भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र या विषयांचे पेपर असतील. मूळ परीक्षेत ग्रेस गुण मिळूनही नापास झाल्यास जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुरवणी परीक्षा होईल. त्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. पुरवणी परीक्षेत नापास झाल्यास विद्यार्थ्याला नापास होऊन त्याच वर्गात बसावे लागेल. पुरवणी परीक्षेतदेखील संबंधित विद्यार्थी नापास झाल्यास तो नापासच राहणार आहे.

विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात परीक्षा महत्त्वाचा व अविभाज्य घटक आहे. पूर्वी तर चौथी व सातवीच्या परीक्षा केंद्रामार्फत घेतल्या जायच्या. विद्यार्थ्यांना केंद्र स्थळी परीक्षा द्यायला जावे लागत होते. त्यावेळी परीक्षांचे देखील एक दडपण मुलांवर असायचे. मुले अभ्यास सुद्धा करायचे. त्या परीक्षांमुळेच विद्यार्थ्यांच्या वास्तविक गुणवत्तेची स्थिती कळायची. बालकाच्या शिक्षणाचा कायदा, बाल मानसशास्त्र व यातील तज्ज्ञ यांच्यामुळे थेट आठवीपर्यंतच्या परीक्षाच रद्द झाल्या. विद्यार्थ्याला काहीही झाले तरी नापास करायचे नाही हा महत्त्वाचा बदल शिक्षणव्यवस्थेत आला. मात्र, पूर्वी वार्षिक परीक्षा झाल्यावर निकालाच्या वेळी गुणपत्रक मिळायचे. वर्गात कुणाचा नंबर आला ते समजायचे. पण त्यातही बदल करून गुणांऐवजी श्रेणी लिहिली जाऊ लागल्यामुळे कोणता विद्यार्थी गुणवत्तेमध्ये समोर आहे, हेच पालकांना कळत नव्हते. त्यामुळे मुलांच्या जीवनातील परीक्षेचे महत्त्वच कमी झाले होते. विद्यार्थी सुद्धा परीक्षेला महत्त्व देत नव्हते. बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड राहत नव्हती. माझ्या मित्राला काहीच येत नाही तो शाळेतही येत नाही तरी तो पास झाला ही विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भावना आता कुठेतरी लोप पावणार आहे.