भाव भिडले गगनाला.! घरकुल बांधकामासाठी गरिबांवर वाढला अधिकचा बोजा...

भाव भिडले गगनाला.! घरकुल बांधकामासाठी गरिबांवर वाढला अधिकचा बोजा...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - साहिल रामटेके, भंडारा

शासनाकडून दारिद्र रेषेखालील गोरगरिबांना विविध योजनेद्वारे घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. परंतु रेती, सिमेंट,लोखंड व विटांचे भाव गगनाला भिडले आहेत. आता तर एक हजार विटांची किंमत पाच ते सहा हजार रुपयांपर्यंत गेल्याने वीट मालकाला एका वर्षात लाखो रुपयांचा फायदा होत आहे. मात्र घरांचे व घरकुलांचे बांधकाम करणाऱ्या गोरगरिबांना विटांचे भाव वाढल्याने घर बांधण्यासाठी अधिकचा बोजा सहन करावा लागत आहे.

दारिद्र रेषेखालील नागरिक परिस्थितीनुसार मोठ्या अडचणीतून मार्ग काढत आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. काही नागरिकांना घरकुल मंजूर झाल्याने आपले मोडके-तोडके व झोपडीवजा घर पाडून दुसऱ्याच्या घरी गत आठ-दहा महिन्यांपासून भाड्याने खोली करून राहावे लागत आहे. काही नागरिकांचे घरकुल मंजूर झाले परंतु निधी मिळाला नाही. काहींनी अर्धवट बांधकाम केले परंतु,त्याच्या घरकुलाचे अनुदान बांधकाम अभावी अजूनही मिळाले नाही. अशातच वीट व्यवसाय करणाऱ्या वीटमालकांनी विटांचे भाव वाढविले, त्याचा अधिकचा भार आता गोरगरीब नागरिकांना सोसावा लागत आहे. म्हणजेच गोरगरीब व दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या नागरिकांसाठी इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती आणून ठेवली आहे.

सध्या ग्रामीण भागात घरकुल बांधकामासाठी ग्रामपंचायत हद्दीत एक लाख पन्नास हजार रुपये मिळत आहेत. तर नगरपरिषद महानगरपालिका हद्दीत गोरगरीब नागरिकांसाठी दोन लाख पन्नास हजार रुपये मिळत आहेत. मात्र विटांचे भाव गगनाला भिडल्याने गोरगरिबांना घर बांधणे कठीण झाले आहे.