पालखेड कॉलनी परिसरात बिबट्याची दहशत; नागरिकांनी केली पिंजरा लावण्याची मागणी...

पालखेड कॉलनी परिसरात बिबट्याची दहशत; नागरिकांनी केली पिंजरा लावण्याची मागणी...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील पालखेड कॉलनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असून, या बिबट्याने अनेक शेतकऱ्यांची पाळीव प्राण्यांवर तसेच गाई, शेळ्यांवर हल्ला केल्याने नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाल्याने या परिसरात तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी केली आहे.

तालुक्यातील अनेक गावांना या बिबट्यांचे ग्रहण लागल्याने नागरिकांपुढे मोठा प्रश्न पडला आहे. काही ठिकाणी जीवित हानी तर काही ठिकाणी चिरफाड करण्याचे देखील प्रकार झाल्याने; याला जबाबदार कोण अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. काही दिवसांपूर्वी पालखेड बंधारा येथील गावालगत असणाऱ्या शिवाजी सोळसे यांच्या गोठ्यातील सहा शेळ्या या बिबट्याने हल्ला करून मारून टाकल्या; तसेच मारुती फाटा परिसरात शामराव गायकवाड यांच्या गाईवर हल्ला केल्याने या गाईचा मृत्यू झाला. गावाच्या हाकेच्या अंतरावर असणारे शेतकरी शामराव गायकवाड यांच्याही कुत्र्यावर हल्ला केला. काल रात्री अशोक गायकवाड यांच्याही बंगल्याजवळ या बिबट्याचे आगमन झाले व त्यांच्या कुत्र्यालाही फस्त केले. यामुळे सध्या या बिबट्याची दिवसेंदिवस दहशत वाढत असून, अजून किती दिवस याचा त्रास सहन करायचा असा प्रश्न केला आहे. काही शेतकऱ्यांच्या सीसीटीव्ही मध्ये हे बिबटे कैद झालेले आहेत. या घटना तालुक्यात घडत असताना याचे कुणालाही सोयरेसुतुक नसल्याने नागरिकांमध्ये संताप व नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित खात्याचे अधिकारी येतात बिबट्याच्या पायाची ठसे घेतात व निघून जातात त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले जाते मग कुठेतरी पिंजरा येतो तो लावला जातो परंतु बिबट्याची मात्र वाट पाहावी लागते. सध्या तालुक्यामध्ये अशीच अवस्था पाहावयास मिळत आहे.

संबंधित खात्याचे अधिकारी व कर्मचारी त्यांचे काम प्रामाणिक करतात.! परंतु असे असले तरी या बिबट्यांची तालुक्यात दहशत ही कायमच आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे गाई, म्हशी, कुत्रे, शेळ्या, कोंबड्या हे मुख्य प्राणी या बिबट्याची शिकार होत आहेत. त्यामुळे अनेकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.  पोटच्या मुलासारखे हे जनावरे संभाळले जातात मात्र त्यांची अवस्था जर अशी होत असेल तर शेतकऱ्यांनी करायचं काय? असा प्रश्नही सध्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे. तालुक्यात बिबट्यांची संख्या पाहता या खात्याकडे कर्मचारी वर्गाची कमतरता भासताना दिसत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी तरच थोड्या प्रमाणात का होईना या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यामध्ये संबंधित खात्याला यश येईल त्याचबरोबर पिंजरांची संख्या ही वाढवावी तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.