झाशीनगर उपसा सिंचन चे पितळ उघडे.! अधिकारांच्या संगनमताने कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम...

झाशीनगर उपसा सिंचन चे पितळ उघडे.! अधिकारांच्या संगनमताने कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम...

NEWS15 प्रतिनिधी : सुधीर शिवणकर

गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झाशीनगर उपसा सिंचन योजना येरंडी दरो गावालगत; इटियाडोह प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रात उत्तर दिशेला सन १९९५-९६ मध्ये प्रस्ताव तयार करण्यात आले. भाजपा शिवसेना युतीच्या शासन काळात तत्कालीन पाटबंधारे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री महादेवराव शिवणकर यांनी शेतकऱ्यांसाठी हरित क्रांतीचे स्वप्न साकारणारी झाशीनगर उपसा सिंचन योजना अंमलात आणली. या योजनेला १८ ऑक्टोबर १९९६ मध्ये १४ कोटी ४३ लाख रुपये मुळ प्रशासकीय मान्यता मिळाली.

या योजनेत बुडीत क्षेत्रातून २५.२३ दशलक्ष घनमीटर पाण्याचा उपसा करून झाशीनगर, धाबेपवनी लगत असलेल्या १२ आदिवासी गावातील २ हजार ५०० हे. आर. जमिन सिंचनाखाली आणण्याचे नियोजन करण्यात आले होते. ही योजना सन २००५-०६पर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होती. परंतू लोकप्रतिनिधी व कामचुकार अधिकारी यांचे मुळे सन २००८ ला पुन्हा वाढीव प्रस्ताव तयार करून, तत्कालीन आमदार नाना पटोले यांनी ४५ कोटी १८ लाख रुपयांची प्रथम सुधारीत प्रशासकिय मान्यता मिळवून दिली. हे काम सन २०११ पर्यंत कासवगतीने सुरू होते. सदर काम अप्रोच चॅनलचे बांधकाम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले होते. उर्ध्वनलिका मांडणीचे काम जवळपास ५० टक्के पूर्ण झाले होते. मुख्य कालवा ० ते १३.५० किमी. मातीकाम ५० टक्के पूर्ण झाले होते. त्यावेळेस लघुकालवा व उपलघुकालव्याचे सर्वेक्षण झाले होते. पण निधी अभावी ते काम रखडले. नंतर या योजनेची सुधारीत किंमत वाढवून आजघडीला १५० कोटी रूपयांवर पोहचली आहे आणि काम सन २०२१-२२ ला पुर्णत्वास येऊन माजी सामाजिक न्यायमंत्री व पालकमंत्री राजकुमार बडोले उपसाचे पाणी शेतकऱ्यांसाठी खुले करणार होते.परंतू राजकीय पुढाऱ्यांच्या श्रेय लाटण्याचे दुर्दैवाने दोन वर्षांत शेतकऱ्यांचे शेतीला पाणी मिळू शकले नाही. पण २१जानेवारी २०२३ या नविन वर्षात झाशीनगर उपसा सिंचन योजनेच्या अधिका-यांनी पाणी सोडण्यासाठी मुर्हुत काढला. कोणालाही सुचित न करता येरंडी, जब्बारखेडा येथील शेतकऱ्यांना सोबत घेऊन उपअभियंता हिंगणे, शाखा अभियंता कापगते यांनी उपसा सिंचनचे पाणी चालु करताच मुख्य कालव्यापासून दोन किमी. अंतरावर उत्तर दिशेला सिमेंट नहर दोन मीटर फुटून झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे नहराचे बांधकामांचे पितळ उघडे पडले. मोक्यावर जब्बारखेडा जवळील मुख्य नहराचे सिमेंट काॅक्रिटचे  काम लक्ष्मी कंन्ट्रक्शन गोरेगाव यांना असून, पेटी कंत्राटदार चौरागडे करीत असल्याचे तेथील काम करणाऱ्या मजुरांनी सांगितले. वास्तविक मोक्यावर मुख्य नहराला बनविण्यासाठी वापरलेला सिमेंट, काॅक्रिंट निकृष्ट दर्जाचा वापरल्याने अनेक ठिकाणी नहराला भेगा पडून सिमेंट मधून सलाखी दिसत आहेत. दोन वर्षाआधी बनविलेल्या नहराला भेगांना रिपेअर करत सुद्धा आजही भेगा पडल्याचे दिसत आहे.

शेतकऱ्यांची हरित क्रांती घडविणारी झाशीनगर उपसा सिंचन योजना या परिसरात वरदान ठरली. मात्र , शेतीसाठी सिंचन योजनेचे पाणी सोडताच नहर फुटून नहराला भेगा पडल्या. कंत्राटदार व अधिकारी यांनी या सिंचन योजनेच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्याचा वापर करून बांधकाम केले. या झाशीनगर उपसा सिंचन योजनेच्या अधिकारी व कंत्राटदारावर निकृष्ट दर्जाचे काम केलेल्या कामाची विभागिय चौकशी करण्यात यावी अशी मागणी चंद्रकला ठवरे पं.स.सदस्या अर्जुनी मोरगाव यांनी केली आहे.