मनोज जरांगे पाटलांची तब्येत बिघडली.! नाकातून रक्तस्त्राव आणि बोलताही येईना...

मनोज जरांगे पाटलांची तब्येत बिघडली.! नाकातून रक्तस्त्राव आणि बोलताही येईना...

NEWS15 मराठी रिपोर्ट - जालना

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून जरांगे यांनी अन्न तसेच पाण्याचा त्याग केला असल्याने, त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असून, त्यांना बोलताही येत नाही. 

अनेकांनी विनंती करून देखील पाणी घेण्यास मनोज जरांगे यांनी नकार दिला आहे. मंगळवारी मनोज जरांगे यांचे हात थरथरत होते, बोलण्यास देखील त्रास होत आहे. त्यामुळे त्यांची अशी सर्व परिस्थिती पाहून त्यांच्या सहकाऱ्यांची चिंता वाढली आहे.

मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांनी बंदची हाक दिली आहे. आज जालना, बीड, सोलापूर आणि नाशिकमधील अनेक गावांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज उत्तर सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा समाज बांधवाकडून सोलापुरातील कोंडी गावात ही बंद पुकारला आहे. गावात सकाळपासून सर्व दुकाने बंद, केवळ दुध आणि अत्यावश्यक सेवा सुरु  आहे. सरकारने दिलेला शब्द पाळत आरक्षणाची अंमलबजावणी करावी, मराठा बांधवाची भूमिका आहे. 

दरम्यान, डॉक्टरांचं एक पथक तातडीने अंतरवाली सराटी येथे दाखल झालं आहे. मात्र, जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत राज्य सरकार सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा आणि विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला न्याय देत नाही, तोपर्यंत मी माझे उपोषण माघार घेणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे डॉक्टरही चिंताग्रस्त आहे. नाकातून रक्त येणे ही गंभीर बाब असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.