आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळासाठी सामुहीक आत्मदहनाचा प्रयत्न.! आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात...

आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळासाठी सामुहीक आत्मदहनाचा प्रयत्न.! आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - किरण मुक्कावार

आर्य वैश्य समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाच्या विकासासाठी शासनाने 'आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ' स्थापन करावे म्हणून; मंत्रालयासमोर सामुहीक आत्मदहन करण्याच्या हेतूने मंत्रालयाकडे निघालेल्या १३ आंदोलकांना मरीन ड्राईव्ह, मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या विषयी प्राप्त माहितीनुसार 'आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्रच्यावतीने दि. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री, उप-मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन शासनाने 'आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ' स्थापन करावे म्हणून सामुहीक आत्मदहन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार शासनाने त्यांच्या मागणीची/निवेदनाची दखल न घेऊन 'आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ' स्थापन न केल्यामुळे संघर्ष समितीचे पदाधिकारी मुंबईत दाखल झाले. या बाबींची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने आंदोलकांचे मोबाईल ट्रॅक करून आंदोलकांना बोलार्ड इस्टेट, मुंबई येथून दि. ०५ मार्च मंगळवार रोजी दु. १२ वाजेच्या दरम्यान ताब्यात घेतले. ही कारवाई दारव्हा, औरंगाबाद आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दारव्हा जि. यवतमाळ आणि छत्रपती संभाजीनगर चे पोलीस मागील दोन दिवसांपासून आंदोलक नंदकुमार लाभसेटवार आणि ब्रह्मानंद चक्करवार यांच्या मागावर होते. पण संबंधितांचे भ्रमणध्वनी बंद येत होते. लोकेशन सतत बदलत होते. अखेर मरीन ड्रॉईव्ह, मुंबई पोलिसांनी त्यांच्या पध्दतीने संबंधितांचे मोबाईल लोकेशन ट्रेस करून आंदोलकांना ताब्यात घेतले. यासाठी पोलीस आयुक्त मुंबई यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त काशीद यांच्याकडे या प्रकरणाची जबाबदारी देऊन एका विशेष पथकाची स्थापना केली होती. त्यानुसार सहा. पो. आयुक्त काशीद, सहा. पो. निरीक्षक अरविंद शिंदे यांनी इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह ही कारवाई केली.

यावेळी त्यांनी संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदकुमार लाभसेटवार, सचिव ब्रह्मानंद चक्करवार, गोविंद केशवशेट्टी, अनिल डूब्बेवार, संतोष उत्तरवार, मयूर मामीडवार, मनोज तम्मेवार, सिताराम देबडवार, राजकुमार मुत्तेपवार, बालाजी पांपटवार, नरेश ऱ्याकावार, संतोष फुटाणे, दिनेश पेकमवार आदींना ताब्यात घेऊन त्यांना आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले. त्यानंतर आझाद मैदान पोलिसांनी त्यांना संबंधीत विभागाचे उप-सचिव दे. आ. गावडे, नवीन प्रशासकीय इमारत यांच्याकडे नेऊन त्यांच्या मागणी विषयी चर्चा घडवून आणली. यावेळी उप-सचिव गावडे यांनी यासंबंधी मुख्यमंत्री महोदयांकडे तुमची बैठक लावण्यात आली असून, त्याबाबतचे पत्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून आपणास पाठविण्यात आले आहे असे सांगितले. उप-सचिवांकडील या बैठकीनंतर पोलिसांनी आंदोलकांचा जबाब नोंदवून, नोटीसा बजावून त्यांना सोडले. पोलिसांच्या या सतर्कत्यामुळे मोठा अनर्थ ठरल्याचे बोलल्याजात आहे.