5 कोटीच्या खंडणी प्रकरणी मनसेच्या प्रमुख नेत्यावर गुन्हा दाखल.! राज ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्ती...

5 कोटीच्या खंडणी प्रकरणी मनसेच्या प्रमुख नेत्यावर गुन्हा दाखल.! राज ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्ती...

NEWS15 मराठी मुंबई रिपोर्ट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे; अविनाश जाधव आणि इतर काहींच्या विरोधात लोकमान्य तिळक मार्ग पोलीस स्टेशनमध्ये पाच कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी FIR दाखल करण्यात आला आहे. 

सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये खंडणी, मारहणीबरोबरच कट चल्याचाही ठपका जाधव यांच्यासहीत इतर आरोपींवर ठेवण्यात आला आहे. ठक्कर, अविनाश जाधव यांच्याबरोबर आणखीन 5 ते 6 जणांचा या आरोपपत्रामध्ये उल्लेख असल्याची माहिती समोर येत असून या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश कांतीलाल जैन यांनी ही तक्रार दाखल केली असून, ते मरिन ड्राईव्हचे रहिवाशी आहेत. तर सोन्याचा व्यवसाय करतात. त्यांनी बुधवारी तक्रार दाखल केली आहे. शैलेश कांतीलाल जैन हे त्यांच्या ज्वेलरी शॉपमध्ये वैभव ठक्कर याच्यासोबत व्यवहार करत होते. याच दरम्यान अविनाश जाधव, त्यांचा चालक आणि इतर पाच ते सहाजण सुरक्षारक्षकासह बळजबरीने शॉपमध्ये आले. जैन यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. ते म्हणालेत की, अविनाश जाधव त्यांच्या ऑफिसमध्ये आले आणि त्यांचा मुलगा सौमिल याला मारहाण केली. तसेच पाच कोटी दिले नाहीत तर मुलाला घेऊन जाण्याची धमकी दिली. जैन यांच्या ऑफिसमधील सीसीटीव्हीमध्ये सर्व प्रकार कैद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फूटेज तपासले जात असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

पोलि‍सांनी आयपीसीच्या कलम ३८५ ( खंडणी वसूल करण्यासाठी एखाद्याला धमकी देणे), कलम १४३ (बेकायदेशीर कृत्य), कलम १४७ (दंगल घडवण्याचा प्रयत्न करणे), कलम ३२३ (स्वेच्छेने इजा पोहोचवणे) आणि कलम १२०-बी (कट रचणे) इत्यादी कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वैभव ठक्कर आणि अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय.

अविनाश जाधव हे मनसेचे ठाण्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. आंदोलने असो किंवा कार्यक्रम असो अविनाश जाधव हे कायम वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून बातम्यांमध्ये चर्चेत असतात. मनसेने मध्यंतरी काही निष्ठावान कार्यकर्त्यांना नेतेपद बहाल केली होती. त्यामध्ये अविनाश जाधव यांचाही समावेश आहे. मागील अनेक वर्षांपासून ते ठाण्यामध्ये मनसेचं नेतृत्व करतात. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर पालघर जिल्ह्यातील समन्वयकपदाची जबाबादारी सोपवण्यात आली आहे. अविनाश जाधव हे मनसेचा ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील चेहरा म्हणून ओळखले जातात. तसेच ते राज ठाकरेंचेही निकटवर्तीय आहेत. संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर यांच्याबरोबरीने मागील अनेक वर्षांपासून ते मनसेमध्ये सक्रीयपणे कार्यरत आहेत. त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अद्याप पक्षाने अधिकृत प्रतिक्रिया नोंदवलेली नाही