चाकूर - अहमदपूर तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची भेट
![चाकूर - अहमदपूर तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची भेट](https://news15marathi.com/uploads/images/202405/image_750x_664849685a005.jpg)
प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी जलसंधारणाच्या विविध कामांना भेटी देवून पाहणी केली. तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधून या कामांबाबत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. चाकूर, अहमदपूर तालुक्यातील कामांचा यामध्ये समावेश होता.
जिल्हा जलसंधारण अधिकारी अनिल कांबळे, चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव, उपजिल्हा जलसंधारण अधिकारी जे. बी. पटेल, तालुका कृषी अधिकारी संजयकुमार गायकवाड, मुख्याधिकारी अजय नरळे, जलसंधारण अधिकारी विशाल कराड, मंडळ अधिकारी एन. के. गायकवाड, तलाठी अविनाश पवार, मंडळ कृषी अधिकारी शिरीष खंदाडे, कृषी पर्यवेक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, बालाजी घोडके, कृषी सहाय्यक विनोद सूर्यवंशी यांच्यासह शेतकरी यावेळी उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियानाच्या टप्पा दोन अंतर्गत चाकूर येथे नाला खोलीकरण व सरळीकरणाचे काम करण्यात आले असून या कामाची जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी पाहणी केली. सुमारे आठ मीटर रुंदीकरण आणि अडीच मीटर खोलीकरण असे या कामाचे स्वरूप आहे. जवळपास तीन किलोमीटर लांबपर्यंत या नाल्याच्या खोलीकरण व सरळीकरणाचे काम करण्यात आल्याने 540 सहस्त्र घनमीटर अतिरिक्त पाणीसाठा निर्माण होणार आहे. तसेच आजूबाजूच्या सुमारे 25-30 विहिरी, विंधन विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होण्यास या कामामुळे मदत होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
अहमदपूर तालुक्यातील मोगा येथील नाल्यावर जलसंधारण महामंडळ निधीतून उभारण्यात आलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याच्या कामाला जिल्हाधिकारी यांनी भेट दिली. या कामामुळे 90 सहस्त्र घनमीटर पाणीसाठा निर्माण होणार असून जवळपास 23 हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा निर्माण होईल. नुकतेच या बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. यासोबतच गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानातून मोगा येथील लघुपाटबंधारे तलावातील गाळ उपसा सुरु असून येथील कामाचीही जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी पाहणी केली. या तलावातून आतापर्यंत 39 हजार 100 घनमीटर गाळ उपसा करण्यात आला असून त्यामुळे 39 लाख लिटर अतिरिक्त पाणीसाठा निर्माण होणार आहे. या तलावातून उपसलेला गाळ आजूबाजूच्या 5 गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नेवून टाकला असल्याने तेथील जमीनही सुपीक बनण्यास मदत होईल.
कोपरा येथील लघुपाटबंधारे तलावातूनही गाळ उपसा करण्यात येत असून आजूबाजूच्या तीन ते चार गावातील शेतकरी यामध्ये सहभागी झाले आहेत. जवळपास 26 हजार घनमीटर गाळ आतापर्यंत उपसण्यात आला आहे. स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक शेतकरी यांना या कामासाठी शासनाने मदत उपलब्ध करून दिली असून यामुळे गरीब शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये गाळ नेवून टाकणे शक्य झाले आहे. याबाबत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्याशी संवाद साधताना शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.