9 जुलै पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास ग्रामपंचायत सदस्य व सरपंचपद होणार रद्द...

प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
राज्य शासनाच्या दि.10 जुलै 2023 रोजीच्या अध्यादेशानुसार दि.1 जानेवारी 2021 ते 10 जुलै 2023 दरम्यान पार पडलेल्या ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक व पोट निवडणुकामध्ये राखीव जागेवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 12 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत दि.9 जुलै 2024 रोजी संपत आहे.
त्यामुळे दि.1 जानेवारी 2021 ते दि. 30 जून 2023 या कालावधीत पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक पोटनिवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवारांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र 9 जुलै 2024 रोजीपर्यंत सक्षम प्राधिकारी यांच्याकडे सादर करावे असे आवाहन उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) नितीन वाघमारे यांनी केले आहे.
बारा महिन्यांच्या मुदतवाढीच्या कालावधीत ज्या उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र सक्षम प्राधिकारी यांच्याकडे सादर केले नाही.! अशा उमेदवारांचे सदस्य, सरपंचपद भूतलक्षी प्रभावाने रद्द झाले असल्याचे मानण्यात येईल असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.