अजित पवारांची पाठ फिरताच धुतले रस्ते...
![अजित पवारांची पाठ फिरताच धुतले रस्ते...](https://news15marathi.com/uploads/images/202408/image_750x_66b7563ab01ab.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरीत गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या गाजावाजात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जनसन्मान रॅली,मेळावा घेण्यात आला. मात्र,या कार्यक्रमातून पवार यांची पाठ फिरताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी सरकार फसव्या योजना आणून सर्वसामान्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप करत दिंडोरी चौफुलीवर गुलाबी पाण्याने रस्ता धुतला.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीच्यावतीने जनसन्मान यात्रेला दिंडोरीमधून सुरुवात झाली. यावेळी अजित पवारांनी आपल्या दौर्याची गुलाबी गाडी,गुलाबी जॅकेट, गुलाबी थंडी अशा प्रकारे गुलाबी थीम ठेवली होती. यावर शरद पवार गटाच्या पदाधिकार्यांनी निशाणा साधत सगळं असं गोड गोड गुलाबी गुलाबी करून जनतेचे प्रश्न सुटत नसतात.औद्योगिक वसाहतीचा प्रश्न भीषण आहे.युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न ‘आ’ वासून उभा आहे. या प्रश्नांवर बोलायचे सोडून अजित पवार यांनी फक्त ‘माझी लाडकी बहीण’चे कौतुक केले असल्याचा देखील आरोप पदाधिकार्यांनी केला.अजित पवारांनी कितीही गोंजारण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही फसणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष शाम हिरे यांनी सांगितले.
याप्रसंगी युवक कार्याध्यक्ष संतोष रहेरे,संदीप भेरे,मनोज खांदवे, शैलाताई उफाडे, मोहन गोडे,सागर गुंबाडे,सोमनाथ रहेरे,ऋषी धोंडगे, अमोल भवर,किशोर लाहंगे,सागर उखर्डे आदी उपस्थित होते.