लम्पी रोगाच्या नुकसान भरपाईपोटी; राज्यातील ३ हजार पेक्षा अधिक पशुपालकांच्या खात्यावर ८.०५ कोटी रुपये जमा - सचिंद्र प्रताप सिंह
![लम्पी रोगाच्या नुकसान भरपाईपोटी; राज्यातील ३ हजार पेक्षा अधिक पशुपालकांच्या खात्यावर ८.०५ कोटी रुपये जमा - सचिंद्र प्रताप सिंह](https://news15marathi.com/uploads/images/202211/image_750x_6360bcfeb4152.jpg)
प्रतिनिधी - पुणे
मागील काही महिन्यांपासून देशात आणि राज्यता लम्पी रोगाने थैमान घातलं असून, या आजाराने राज्यात अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील लम्पीमुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या 3091 पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई पोटी रु. 8.05 कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याचे; पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले आहे.
पुढे बोलतांना आयुक्त सिंह म्हणाले की, राज्यामध्ये दि. 31 ऑक्टोबर २०२२ अखेर 33 जिल्ह्यांमधील एकूण 3204 गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 172528 बाधित पशुधनापैकी एकूण 112683 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 140.97 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 136.48 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे व जळगांव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, वाशिम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेल्या लसीकरणानुसार महाराष्ट्रात सुमारे 97.54 % गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.
लम्पी चर्मरोगाच्या विषाणुच्या जनुकीय परिक्षणांतर्गत जिनोम क्रमवारीता तपासणीसाठी आवश्यक नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. या तपासणीमुळे विषाणूमधील जनुकीय स्तरावरील बदलांबाबतची माहिती नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित आहेत. तसेच लसीमुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक नमूने ७ विभागांमधून प्रतिविभाग दोन गावातील पशुधनातील लसीकरणापुर्वीचे नमुने व लसीकरणानंतरचे ७, १४, २१ व २८ दिवसांचे रक्तजल नमुने संकलित करुन ते बेंगलुरु येथील राष्ट्रीय रोगपरिस्थिती विज्ञान व रोगमाहिती संस्था येथे पाठविण्यात आले आहेत. त्यांचे निष्कर्ष देखील नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षीत असल्याचे आयुक्त यांनी सांगितले.