संदीप जगताप यांच्या कविता साता समुद्रापार.! शिकागो येथील महाराष्ट्र मंडळाने आयोजित केले ऑनलाईन व्याख्यान...

संदीप जगताप यांच्या कविता साता समुद्रापार.! शिकागो येथील महाराष्ट्र मंडळाने आयोजित केले ऑनलाईन व्याख्यान...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

अमेरिकेतील शिकागो येथील मराठी मंडळाच्यावतीने दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील प्रसिद्ध कवी प्रा.संदीप जगताप यांच्या  मनातल्या आणि मातीतल्या कविता " या विषयावर भारतीय वेळेनुसार १० जुलै ला सायंकाळी ६.३० वाजता ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे.हा कार्यक्रम शिकागो व अमेरिकेत राहणारी मराठी माणसे ऑनलाईन बघणार आहे.नाशिक जिल्ह्याच्या दृष्टीने साता समुद्रा पार संदीप जगताप यांच्या कविता पोहचणार आहे.ही अभिमानाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी दिली आहे. या कार्यक्रमाचे आयोजन शिकागो येथे राहणारे महाराष्ट्र मंडळाचे समन्वयक माधव गोगावले यांनी केले आहे.

संदीप जगताप यांचा परिचय महाराष्ट्रातला शेतकऱ्यांचा दमदार कवी म्हणून आहेच.तसेच त्यांच्या व्याख्यानाचे कार्यक्रम राज्यभर व राज्याबाहेर देखील लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव समारंभामध्ये संदीप जगताप यांच्या कविता व त्यांचे भाषण विद्यार्थी डोक्यावर घेतात. शेतकऱ्यांची वेदना व्यथा मांडणारी कविता व काळजाचा ठाव घेणारी ओघवती निवेदन शैली यामुळे संदीप जगताप अल्पावधीत लोकप्रिय झाले. बेळगाव मध्ये देखील नुकतेच तेथील मराठी माणसांनी त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते.त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

एक बाजूला कविता लेखन व दुसऱ्या बाजूला सक्रिय शेतकरी चळवळीतील सहभाग आजही शेती करत मातीशी जपलेली नाळ यामुळे त्यांचे विचार वास्तववादी व तितकेच धारदार बनतात.समाजव्यवस्थेवर त्यांच्या कविता अचूक आसूड ओढतात त्यामुळे त्यांच्या व्याख्यानाना महाराष्ट्रामध्ये व महाराष्ट्र बाहेर देखील मागणी आहे.

प्रतिक्रिया...!

शिकागोतील मराठी माणसांनी अतिशय आत्मीयतेने माझे व्याख्यान आयोजित केले याचा मला निश्चितच आनंद झाला.जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात मराठी माणूस राहत असेल तर त्याच्याशी बोललं पाहिजे या विचारातून मी या कार्यक्रमाला होकार दिला.शेतकरी चळवळीत काम करताना लेखनाकडे दुर्लक्ष झाले आहे.परंतु मी कवितेची नाळ तुटू दिली नाही.म्हणून निवडक कार्यक्रमाला जात असतो.आज ही श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो.व ती प्रेरणा मला लिहतं व बोलतं ठेवते.

- संदीप जगताप