मिचौंग चक्रीवादळाचे संकट.! महाराष्ट्रात मुसळधार पाऊस तर ह्या ४/५ जिल्ह्यांना झोडपणार
![मिचौंग चक्रीवादळाचे संकट.! महाराष्ट्रात मुसळधार पाऊस तर ह्या ४/५ जिल्ह्यांना झोडपणार](https://news15marathi.com/uploads/images/202312/image_750x_656d4bcc08c2b.jpg)
NEWS15 मराठी रिपोर्ट - आत्ताच राज्याला अवकाळी पावसाने झोडपले असून, ह्या अवकाळी पावसाने राज्यातील लाखों शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान करत हातातोंडाशी आलेला घास हिसकावला आहे. त्यातच आता राज्यासमोर पुनः एकदा चक्रीवादळाचे संकट उभे राहिले असून, बंगालच्या उपसागरात मिचौंग चक्रीवादळ तयार झालं आहे. दि. ५ डिसेंबर रोजी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि मछलीपट्टणमदरम्यान धडकण्याची शक्यता वर्तवली असून, चक्रीवादळाचा वेग ताशी १०० किलोमीटरपर्यंत असल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मिचौंग चक्रीवादळाचा महाराष्ट्राला कोणताही धोका नाही. मात्र, चक्रीवादळात मोठ्या प्रमाणावर बाष्प असल्याने पुढील ३ ते ४ दिवसात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पुन्हा अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
तर मराठवाड्यातील लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना जिल्ह्यात तर विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर आणि वाशिम जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. याशिवाय काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊसही पडेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.
मिचौंग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू किनारपट्टी आणि आंध्र प्रदेशात भारतीय हवामान विभागाने ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. IMD कडून तामिळनाडूमधील उत्तर किनारपट्टी, पुद्दुचेरी आणि कराईकल येथे अती मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दक्षिण आणि पूर्व भारतातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.