पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना नासा-इस्रो भेटीची संधी...
प्रतिनिधी - विश्वनाथ केसवड, खेड
पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील २५ विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा (NASA) या आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्थेला भेट देण्याची, तर ५० विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन केंद्र इस्रो (ISRO) ला भेट देण्याची संधी मिळाली आहे. या विद्यार्थ्यांची निवड आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र व खगोलभौतिकशास्त्र केंद्राकडून (IUCAA) घेण्यात आली असून निकाल जिल्हा परिषदेला कळविण्यात आला आहे.
या निवड प्रक्रियेत शिरूर व खेड तालुक्यातील प्रत्येकी चार विद्यार्थी निवडले गेले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया
विद्यार्थ्यांना नासा व इस्रो भेटीसाठी निवड करण्यासाठी तीन टप्प्यांची प्रक्रिया राबविण्यात आली.
पहिला टप्पा : लेखी परीक्षा
दुसरा टप्पा : ऑनलाइन परीक्षा
तिसरा टप्पा : मुलाखत
ऑनलाइन परीक्षेतून १३ टक्के विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यानंतर ६ ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान आयुकामध्ये २३५ विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातून अंतिम ७५ विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली.
निवड झालेल्या काही विद्यार्थ्यांची नावे :
सिद्धी मंजिरे (मोरडेवाडी, आंबेगाव), रुद्र मोरडे (मोरडेवाडी, आंबेगाव), भास्कर तावरे (सांगवी, बारामती), सोहम टेंभरे (सांगवी, बारामती), आदिती राऊत (धावडी, भोर), आदिती पारथे (निगुडघर, भोर), स्पृहा खेडेकर (शेलारमेमानवाडी, दौंड), आयुष शेलार (गलांडवाडी, दौंड), शंतनू कदम (लोणीकंद, हवेली), श्रावणी मगर (लोणीकंद, हवेली), मोहम्मद उमर शेख (शहा, इंदापूर), साईराज पवार (आळेफाटा, जुन्नर), वेदिका गुजर (भोसे, खेड), सिद्धांत रोकडे (धानोरे, खेड), हर्षवर्धन कोहिनकर (दोंदे, खेड), संभवा राक्षे (थिगळस्थळ, खेड), रुद्र राजगुरू (कान्हे, खेड), दर्शन अडसोड (हिंजवडी), आदित्य आहेर (माण), शिवम बधादे (कोडीत), कस्तुरी मुसमाडे (कोरेगाव भीमा), स्वरूप भागवत (वाबळेवाडी), स्वरूप बन्हाते (पिंपरखेड), शिवम जाधव आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या निवडीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राची प्रत्यक्ष ओळख होणार असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.