अड्याळ ग्रामपंचायतीतील सत्तासंघर्षावर अखेर पडदा.! उपसरपंच शंकरजी मानापुरे प्रभारी सरपंचपदी विराजमान...
प्रतिनिधी - नितीन वरगंटीवार, भंडारा
अड्याळ ग्रामपंचायतीतील सरपंचपदाच्या रिक्ततेमुळे निर्माण झालेला सत्तासंघर्ष आणि प्रशासकीय गोंधळ अखेर संपुष्टात आला आहे. उपसरपंच शंकरजी मानापुरे यांनी २१ जानेवारी २०२६ रोजी प्रभारी सरपंच म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारत ग्रामपंचायतीच्या कारभाराला नवी दिशा दिली आहे.
भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी तत्कालीन सरपंच शिवशंकर मुंगाटे यांना अपात्र ठरवल्यानंतर १४ जानेवारीपासून सरपंचपद रिक्त होते. या काळात गावातील विकासकामे, प्रशासकीय निर्णय आणि दैनंदिन कामकाज ठप्प झाल्याचे चित्र होते. नेतृत्वाअभावी ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता.
मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशानंतर आणि कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत उपसरपंच शंकरजी मानापुरे यांची प्रभारी सरपंचपदी नियुक्ती करण्यात आली. यामुळे ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.
या संदर्भात गटविकास अधिकारी (BDO) यांनी स्पष्ट केले की,
“सरपंचपद रिक्त झाल्यास उपसरपंचाला प्रभारी सरपंचपद देणे ही कायदेशीर तरतूद आहे.”
यालाच दुजोरा देताना विस्तार अधिकारी कल्याणी दवंडे यांनीही ही नियुक्ती पूर्णतः नियमबाह्य नसून कायद्यानुसारच झाल्याचे स्पष्ट केले आहे.
पदभार स्वीकारताच अड्याळ ग्रामपंचायतीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थांनी शंकरजी मानापुरे यांचे जल्लोषात स्वागत केले. रखडलेली विकासकामे लवकरच मार्गी लागतील आणि गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.