राजकीय : खेडमध्ये 'मशाल' पेटण्यापूर्वीच धुसफूस: निष्ठावंतांना डावलून 'आयात' उमेदवाराला झुकते माप; उबाठात बंडाचे निशाण..!

राजकीय : खेडमध्ये 'मशाल' पेटण्यापूर्वीच धुसफूस: निष्ठावंतांना डावलून 'आयात' उमेदवाराला झुकते माप; उबाठात बंडाचे निशाण..!

​News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : खेड तालुक्यातील राजकारण सध्या कमालीचे तापले असून, नाणेकरवाडी-महाळुंगे जिल्हा परिषद गटात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने (उबाठा) घेतलेल्या एका निर्णयामुळे पक्षांतर्गत मोठा भूकंप झाला आहे. वर्षानुवर्षे पक्षाचे झेंडे खांद्यावर घेणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून ऐनवेळी 'आयात' उमेदवाराच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या राजकीय उलथापालथीमुळे निष्ठावंतांच्या निष्ठेचा लिलाव झाल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

नेमकं प्रकरण काय?

​नाणेकरवाडी-महाळुंगे गटातून उबाठा पक्षाकडून नाणेकरवाडीचे माजी उपसरपंच गणेश नाणेकर आणि खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार हे प्रबळ इच्छुक उमेदवार होते. दोघांनीही गटात मोठी तयारी केली होती. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्ष नेतृत्वाकडून धक्कादायक निर्णय झाला. पक्षाचे जुने-जाणते चेहरे बाजूला सारून थेट एका आयात उमेदवाराला 'मशाली'चे तिकीट बहाल करण्यात आले.

पदांच्या 'ऑफर' पेक्षा स्वाभिमानाला महत्त्व..

​मिळालेल्या माहितीनुसार, अमोल पवार यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्ष नेतृत्वाने त्यांच्या पत्नीला पंचायत समितीची उमेदवारी आणि भविष्यात पंचायत समिती सभापती पदाची ऑफर दिली होती. मात्र, ‘मला घरातील सदस्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे नाही, उमेदवारी मलाच हवी’ अशी ठाम भूमिका घेत पवार यांनी ही ऑफर धुडकावून लावली. आमदार बाबाजी काळे यांनी घेतलेल्या या एकतर्फी निर्णयामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये 'मनभेद' निर्माण झाले आहेत.

निष्ठेची जागा 'आर्थिक' निकषांनी घेतली?

​पक्षासाठी घाम गाळणाऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा आर्थिक निकष आणि सोयीच्या राजकारणाला महत्त्व दिले जात असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. विशेष म्हणजे, ज्या उमेदवाराला तिकीट देण्यात आले, त्यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदारांच्या विरोधात काम केले होते. अशा व्यक्तीला झुकते माप दिल्याने प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये ‘कोणासाठी आणि का काम करायचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गणेश नाणेकरांचे 'धनुष्यबाण' हाती; आता लक्ष अमोल पवारांकडे..

​पक्षाकडून डावलले गेल्यानंतर गणेश नाणेकर यांनी आपली राजकीय चुणूक दाखवत थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असून, त्यांना धनुष्यबाणाचे तिकीटही मिळाले आहे. दुसरीकडे, अमोल पवार यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. या गटात निवडून येण्यासाठी अमोल पवार यांचे राजकीय वजन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

 ‘२०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील काही जुन्या राजकीय हिशोबांमुळेच अमोल पवार यांना जाणीवपूर्वक रोखले गेल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. आता अमोल पवार कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकतात, यावर या गटाचे भवितव्य अवलंबून असेल.’