राजकीय : खेडमध्ये 'उबाठा'चा सस्पेन्स वाढला; नाणेकरवाडी-महाळुंगे जिल्हा परिषद गटात निष्ठावंतांना डावलून बाहेरच्याला संधी?
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
खेड (चाकण): पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत खेड तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपत आली असताना, नाणेकरवाडी-महाळुंगे जिल्हा परिषद गटातून उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचा उमेदवार अद्याप निश्चित न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातच, पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून एका 'पक्षविरहित' उमेदवाराला तिकीट मिळण्याच्या चर्चेने गटात खळबळ उडाली आहे.
अमोल पवारांच्या उमेदवारीवर टांगती तलवार?
या गटातून खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि अनुभवी शिवसेना नेते अमोल पवार यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, ऐन शेवटच्या क्षणी रात्रीतून हालचाली बदलल्या असून एका बाहेरील उमेदवाराचे नाव निश्चित झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अमोल पवार यांचा दांडगा जनसंपर्क आणि राजकीय जुळवाजुळवीचे कौशल्य पाहता, त्यांना डावलणे पक्षाला महागात पडू शकते, असा सूर कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.
जर निष्ठावंतांना डावलून बाहेरच्या उमेदवाराला संधी दिली, तर त्याचे गंभीर परिणाम उबाठा पक्षाला भोगावे लागतील. अमोल पवार यांची राजकीय खेळी शेजारच्या गटांवरही प्रभाव टाकू शकते." - स्थानिक राजकीय विश्लेषक
महायुतीचे समीकरण ठरले?
दुसरीकडे, भाजपा आणि शिंदे शिवसेना यांच्यात तालुक्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. या युतीमुळे उबाठा समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या गटात:
* स्व. आमदार सुरेश गोरे यांचे कुटुंबाची भूमिका निर्णायक असणार..
* शिवसेना नेते अतुल देशमुख यांचे समर्थक.
* शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
भाजपा-शिवसेना युतीकडून खराबवाडीचे संदीप सोमवंशी किंवा नाणेकरवाडीचे माजी उपसरपंच गणेश नाणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
आमदार बाबाजी काळे यांची भूमिका काय?
उबाठा पक्षाचे तालुक्यातील नेतृत्व आमदार बाबाजी काळे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. "वरचा उमेदवार पडला तरी चालेल पण आपला पंचायत समितीचा उमेदवार निवडून यावा," अशी काही अंतर्गत खेळी तर सुरू नाही ना? अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. बाहेरचा उमेदवार लादल्यास पक्षातील जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण होऊ शकते.
आता उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत हा 'सस्पेन्स' कायम राहणार की पक्ष निष्ठावंतांना न्याय देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.