दिंडोरी शहरातील चौफुलीचा प्रश्न कधी सुटणार?
![दिंडोरी शहरातील चौफुलीचा प्रश्न कधी सुटणार?](https://news15marathi.com/uploads/images/202311/image_750x_6553a7e0125b1.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुका हा धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो याशिवाय द्राक्षपंढरी म्हणूनही या तालुक्याची साता समुद्रा पार ओळख आहे. याशिवाय तालुक्यात औद्योगिक वसाहत छोटे मोठे उद्योग धंदे याचीही व्याप्ती वाढत असताना देखील दिंडोरी शहरात मात्र आजही वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. यामध्ये पालखेड चौफुली,उमराळे चौफुली, वलखेड चौफुली,या ठिकाणी सणावाराला किंवा रविवार बाजारच्या दिवशी वाहनांच्या रांगाच रांगा लागतात त्यामुळे वाहनधारकांची व पायी चालणाऱ्यांची अवस्था अतिशय बिकट होताना दिसत आहे.
याबाबत शहरातील नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या देखील मात्र आजही त्याकडे दुर्लक्ष होत आहे रविवार बाजारच्या दिवशी खेड्यापाड्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांना आपला भाजीपाल्याचा विक्री करताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे तर असाच त्रास ग्राहक वर्गालाही बसत आहे,या वाहतूक कोंडीमुळे पायी चालणे ही देखील कठीण झाले आहे या चौफुलींवर दोन्ही बाजूंनी वाहनधारक रस्त्यामध्ये कुठेही वाहने तासनतास उभी करतात त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे ॲम्बुलन्स वाल्यांना देखील इमर्जन्सी रुग्ण नेण्यासाठी तासंतास सायरनचा वापर करावा लागतो तेव्हा कुठे या वाहनांना रस्ता रस्ता मोकळा होतो ना सिग्नल ना पार्किंगची व्यवस्था ना पोलीस त्यामुळे अनेक संकटे नागरिकांपुढे उभी आहे. याशिवाय स्वामी समर्थ केंद्र सप्तशृंगी गड रणतळे विंदवासिनी देवी अशी महत्वाची देवस्थाने असल्याने भाविकांची ही मोठी देवदर्शनासाठी गर्दी होत असते तरी देखील आजही या शहरातील चौफुलींचा तिढा काही सुटत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे नेतेमंडळी निवडणुकी मध्ये अनेक आश्वासने आवाहने करतात मात्र निवडणूक झाल्यानंतर कोणालाच याचे सोयरे सुतुक नसल्याने हा तिढा केव्हा सुटणार हे मात्र आजही गुलदस्त्यात आहे.