देशभरात अजून १९ दिवस लॉकडाउन घोषणा, ३ मेपर्यंत राहणार जैसे थे परिस्थिती, नरेंद्र मोदीं यांची मोठी घोषणा..

News15 मराठी ब्युरो रिपोर्ट दिल्ली : करोनाचा फैलाव वाढत असल्याने लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, “करोनाचा फैलाव अद्यापही रोखण्यात यश आलेलं नाही. त्यासंबधी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. लॉकडाउन वाढवला जावा असा सल्ला देण्यात आला आहे. अनेक राज्यांनी आधीच हा निर्णय घेतला आहे. सर्व सूचना लक्षात घेता लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेत आहोत,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. देशवासी एखाद्या योद्ध्याप्रमाणे कार्य करत आहेत. तुम्हाला किती त्रास होतो आहे याची मला कल्पना आहे. तुम्हीच भारताला वाचवलंय, मी सर्वांना नमन करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. “इतर देशांच्या तुलनेत भारताने करोना रोखण्यासाठी जास्त प्रयत्न केले. यामध्ये तुम्हीदेखील मदत केली. करोनाचा एकही रुग्ण नसताना भारताने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग सुरु केली होती. १०० पर्यंत पोहोचण्याआधी परदेशी नागरिकांना आयसोलेशन होण्यास सांगण्यात आलं होतं. ५५० प्रकरणं असताना २१ दिवसांचा लॉकडाउनचा मोठा निर्णय जाहीर केला होता. भारताने समस्या वाढेल याची वाट पाहिली नाही. समस्या दिसली तेव्हाच निर्णय घेऊन त्याचवेळी रोखण्याचा प्रयत्न केला.” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. “इतर देशांशी तुलना करणं योग्य नाही. पण भारताच्या तुलनेत त्यांची स्थिती चिंताजनक होत चालली आहे. भारताने योग्य पावलं उचलली नसती, वेळेवर निर्णय घेतले नसते तर आज भारताची स्थिती काय असती याची कल्पनाच करवत नाही,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. भारताने घेतलेल्या निर्णयांची आज जगभरात चर्चा सुरु आहे असं यावेळी मोदींनी देशाला संभोदीत करताना सांगितले.