पाटणबोरी परिसरातील पाण्याची पातळी खालावली...

पाटणबोरी परिसरातील पाण्याची पातळी खालावली...

प्रतिनिधी - गजू कैलासवार, यवतमाळ

पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याची पातळी खालावल्याने, पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहे. पाणीटंचाईची चाहूल लागली आहे. येथे खुणी नदी असून, नदीतील पाणी आटल्याने ती कोरडी पडली आहे. परिणामी जनावरांना पिण्याकरिता पाणी नाही. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होत झाला आहे. गावातील बहुतांश बोअरच्या पाण्याची पातळी खालावल्याने काही बोअरवेल बंद पडले आहे. काही बोअरधारकांनी नवीन बोअर मारून पाण्याची तजवीज केली. पूर्वी पाटणबोरी येथे 60,70 ते 80 फुटावर पाणी लागायचे. मात्र आता 120,130,140 फुटावर पाणी लागत आहे. काही भागात तर 250,300 फुटापर्यंत बोअर मारावी लागत आहे. पाटणबोरी येथे ग्रामपंचायत मार्फत येणाऱ्या सार्वजनिक नळाचे पाणी नदीतून यायचे. मात्र, ग्रामपंचायतीने नंतरच्या काळात बोअरवरून पाणी संपूर्ण गावात पुरवठा केल्याने संपूर्ण गावात जमिनीच्या आतील पाणी वापरण्यात येत आहे.

भरमसाठ होणाऱ्या पाण्याच्या वापरामुळे गावातील पाण्याची पातळी खोल गेली आहे. ग्रामपंचायतीने सार्वजनिक नळाच्या पाण्याची व्यवस्था नदीवरून केल्यास पाणी पातळी वाढू शकते. अशीच परिस्थिती राहिल्यास येणाऱ्या दिवसात पाणीटंचाई तीव्र रूप धारण करण्याची चिन्हे दिसत आहे. पाटणबोरी येथे नदीवर कोल्हापुरी बंधारा असून, त्याला झडपे नसल्याने तो आता शोभेची वस्तू बनला आहे. याच नदीवर एक दोनदा सर्वे झाला, मात्र कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आलेला नाही. या नदीवर मांडवी पुलाजवळ एक नवीन कोल्हापुरी बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी पाटणबोरीतील नागरिकांकडून होत आहे.