पहिला मॅग्नस कृषी रत्न पुरस्कार पिंपळगावचे अनुदादा मोरे यांना जाहीर

पहिला मॅग्नस कृषी रत्न पुरस्कार पिंपळगावचे अनुदादा मोरे यांना जाहीर

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

मॅग्नस फार्म फ्रेश कंपनी यांच्या वतीने यावर्षी सुरू केलेला पहिला मॅग्नस कृषिरत्न पुरस्कार पिंपळगाव बसवंत येथील युवा शेतकरी व असंख्य शेतकऱ्यांचा प्रेरणास्त्रोत असणारे अनुदादा मोरे यांना देण्यात येणार आहे.अशी माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली.

पुरस्कार प्राप्त अन्नूदादा मोरे यांनी द्राक्ष शेतीमध्ये अनेक यशस्वी प्रयोग केले आहे.आंतरराष्ट्रीय दर्जाच्या द्राक्ष तज्ञांना या देशात आणून त्यांच्या ज्ञानाचा उपयोग इथल्या शेतकऱ्यांना करून दिला आहे.मागील सोळा महिन्यांमध्ये त्यांनी ७५ एकर द्राक्ष बागेची लागवड केली आहे.द्राक्ष शेतीमधील उत्तम पाणी नियोजन, खत नियोजन व कमीत कमी खर्चामध्ये दर्जेदार द्राक्ष उत्पादन. यावर शेकडो शेतकऱ्यांना त्यांनी कृषी साक्षर बनवले आहे.जगातील अनेक चांगले द्राक्षाचे वाण त्यांनी आयात करून इथे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे.शिकलेल्या पिढीमध्ये शेतीची आवड निर्माण करून त्यातून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनुदादा मोरे हे सातत्याने काम करत आहे म्हणूनच अशा कर्तबगार,विचारशील व कृतिशील तरुणाची निवड आम्ही एकमतानं या पुरस्कारासाठी करीत आहोत.अशी माहिती संदीप जगताप यांनी दिली.

मॅग्नस फार्मच्या आवारात लोककवी विठ्ठल वाघ साहित्य पुरस्काराचे वितरण होणार आहे. याच कार्यक्रमात दरवर्षी कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या,नवी दिशा दाखवणाऱ्या शेतकऱ्याला  मॅग्नस कृषीरत्न पुरस्कार दिला जावा.या भावनेने मॅग्नस फार्मचे संस्थापक संचालक लक्ष्मण सावळकर व गिरीश सारडा यांनी  हा पुरस्कार सुरू केला आहे. या पुरस्काराच्या निवडसमितीचे काम प्रा. संदीप जगताप यांनी केले.

या पुरस्काराचे वितरण मंगळवार २८ मे रोजी मॅग्नस फार्मच्या आवारात चित्रपट गीतकार व प्रसिद्ध कवी प्रकाश होळकर,प्रसिद्ध साहित्यिक विजयकुमार मिठे,लक्ष्मण महाडिक , मॅग्नस फार्मचे संस्थापक लक्ष्मण सावळकर,गिरीश सारडा या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

अतिशय मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अनुदादा मोरे यांचे अनेक मान्यवरांनी,शेतकऱ्यांनी अभिनंदन केले आहे.