३५ वर्षापासून सुरू असलेली भंडारा ते पालांदुर मार्गे मुक्कामी बसफेरी बंद.

३५ वर्षापासून सुरू असलेली भंडारा ते पालांदुर मार्गे मुक्कामी बसफेरी बंद.

NEWS15 मराठी प्रतिनिधी - साहिल रामटेके, भंडारा

"प्रवाशांच्या सेवेसाठी" हे ब्रीद घेऊन सेवा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे साकोली आगारातील सहाय्यक वाहतूक अधिक्षकाच्या तुघलकी कारभारामुळे भंडारा ते पालांदुर मार्गे पिंपळगाव/सडक, मुरमाडी/तूप ही मुक्कामी बसफेरी बंद केल्यामुळे; ग्रामीण परिसरातील जनतेची गैरसोय होत आहे. ही बसफेरी नफ्यात चालत असताना बंद का केली गेली? हे कळण्यास मार्ग नसला तरी ही मुक्कामी बसफेरी पूर्ववत सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

लाखनी हे शैक्षणिक केंद्र असल्यामुळे या ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृषी महाविद्यालय, याशिवाय कला, वाणिज्य व विज्ञान विषयाचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण आणि इतरही अनेक अभ्यासक्रम व तांत्रिक शिक्षणाची सोय असल्यामुळे मूरमाडी/तूप. व पालांदूर परिसरातील अनेक विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच तालुका व जिल्हा स्तरावर कामाकरीता येणारे अनेक ग्रामीण ह्या बसफेरीने प्रवास करीत असत. साकोली आगरातून नफ्याने चालणारी ही एकमेव बसफेरी होती. तसेच या बसची भंडारा बस स्थानकावरून सुटण्याची वेळ सकाळी ८:३०, दुपारी ४:०० आणि सायंकाळी ७:०० वाजेची असल्यामुळे सर्वांनाच सोयीचीही होती. ही मुक्कामी बस पालांदुरातील पेट्रोल पंपावर रात्रभर थांबत होती. त्या ठिकाणी चालक व वाहकासाठी डबे खाण्याची व आरमाचीही सोय होती. पण काही खोडसाळ चालक वाहकाने अकारण आगर व्यवस्थापकाकडे तक्रार केल्यामुळे कसलीही शाहनिशा न करता ही बसफेरी साकोली आगरातील सहाय्यक वाहतूक अधिक्षकाने बंद केली. मागील ३५ वर्षापासून या मुक्कामी बसफेरी वरील चालक, वाहक कसे मुक्कामी राहत होते. हा चिंतनाचा विषय झाला आहे. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून विद्यार्थ्यांना पास ची सवलत, महिलांसह ६५ वर्षांवरील पुरुषांना अर्धी तिकीट तसेच ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना निःशुल्क प्रवासाची सुविधा दिली आहे. या सुविधेपासून पिंपळगाव, मुरमाडी/तूप व पालांदूर परिसरातील पात्र लाभार्थी मुकत आहेत. साकोली आगराकडूनच आंतरराज्यिय मुक्कामी बसफेऱ्या चालविलेल्या जातात. तिथे चालक व वाहकाची मुक्कामाची सोय एसटी महामंडळाकडून केली जाते. तर भंडारा ते पालांदूर मार्गे पिंपळगाव/सडक, मुरमाडी/तूप या मुक्कामी बसफेरीतील चालक व वाहकाची व्यवस्था एसटी महामंडळाकडून न करता ही मुक्कामी बसफेरी बंद करून दूजाभाव का केला जातो. हे कळण्यास मार्ग नाही. ही बसफेरी बंद झाल्यामुळे सकाळ पाळीतील विद्यार्थ्यांची गैरसोय तसेच कार्यालयीन कामे आटोपून गावाकडे रात्री परत जाणाऱ्या ग्रामीणांची गैरसोय होत असते. ग्रामीण जनतेचा विचार न करता ही मुक्कामी बसफेरी बंद करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून ही बसफेरी पुन्हा सुरू करावी. अशी ग्रामीण जनतेकडून मागणी होत आहे. 

गरीब विद्यार्थी शिक्षणास मुकले?

मुरमाडी/तूप परिसरात भूमिहीन व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या अधिक असल्यामुळे इच्छा असूनही हुशार विद्यार्थ्यांना तालुका व जिल्हा स्तरावर उच्च शिक्षण घेता येत नाही. भंडारा ते पालांदूर ही मुक्कामी बसफेरी सकाळी भंडारा कडे जात असल्याने अनेक गरीब व हुशार विद्यार्थ्यांनी पास काढून आपले शिक्षण पूर्ण केले. पण २०२३ पासून ही बसफेरी बंद असल्यामुळे काही विद्यार्थी शिक्षणास मुकले आहेत.