राज्याच्या राजकारणात मोठी गडबड.! अशोक चव्हाण यांनी काँग्रेस आणि आमदारकी सोडली...

NEWS15 मराठी रिपोर्ट - मुंबई
राज्याच्या राजकारणात या घडीला एक मोठी घटना घडली असून, माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले काँग्रेस ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय. काँग्रेस पक्ष सदस्यपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलाय. काँग्रेसपदाचा राजीनामा पत्रात त्यांनी माजी आमदार असा उल्लेख केलाय. यामुळे त्यांनी आधी आमदारकीचा राजीनामा दिला होता असं म्हटलं जातंय. अशोक चव्हाण भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत १५ फेब्रुवारी रोजी भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेना, राष्ट्रवादीनंतर राज्यातील काँग्रेसला राज्यात मोठा धक्का बसलाय. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिलाय. सुत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसचे तब्बल ११ आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत आहेत. या ११ आमदारांसह अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील, असं सांगितलं जात आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, “काँग्रेसमधील अनेक चांगले नेते, हे भाजपाच्या संपर्कात आहेत. ज्याप्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्ष वाटचाल करत आहे. त्यातून जनतेशी घट्ट जोडलेल्या नेत्यांची सध्या घुसमट होतेय. त्यामुळे देशभरातील काँग्रेसचे लोकनेते भाजपात प्रवेश करत आहेत. काही मोठे नेते लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे मी आता एवढंच म्हणेन, आगे आगे देखिये होता है क्या…”