अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू.! आमदार गोपीचंद पडळकरांची उपमुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका...

अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू.! आमदार गोपीचंद पडळकरांची उपमुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका...

NEWS15 मराठी रिपोर्ट - भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यातील वाद हा राज्यातला नवा नाही. मात्र मागील काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादीत दोन गट पडून, अजित पवार हे भाजप सहकारी सत्तेत सामील झाले आहेत. त्यामुळं हा वाद किंवा अजित पवारांवरील  आमदार पडळकरांचा रोष कमी झाला असेल असे आपणास वाटू शकते; मात्र असे काही दिसून येत नाही. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एका वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी; उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केलीय. “अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. तसेच “सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक”, अशीही टीका पडळकर यांनी केलीय. त्यामुळं आगामी काळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना धनगर समाजाने देखील आरक्षणप्रकरणी कठोर भूमिका घेत जाट समाजापेक्षा मोठं आंदोलन उभं करण्याची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारला इशारा देणारं पत्र धनगर समाजाचे नेते तथा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे. मात्र दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र पडळकरांनी पत्र लिहिलेलं नाहीये. हाच प्रश्न पडळकरांना विचारला असता, "अजित पवार म्हणजे लांडग्याचं पिल्लू आहे. धनगर समाजाबद्दल त्यांची भावना चांगली नाहीये. त्यांना आम्ही मानत नाही", अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.

गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?

“अजित पवार यांची भावना आमच्या विषयी स्वच्छ नाही. त्यामुळे आम्ही त्यांना पत्र देण्याची गरज नाही. ते लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. त्यांना आम्ही मानत नाहीत. त्यामुळे मी त्यांना आम्ही कधी पत्र दिलं नाही आणि पुढेही पत्र देण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही. ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो त्यांना मी पत्र दिलंय”, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.