नागरिकांनो सावधान.! शहरात १४४ कलम लागू.. पहा कारण काय?
![नागरिकांनो सावधान.! शहरात १४४ कलम लागू.. पहा कारण काय?](https://news15marathi.com/uploads/images/202403/image_750x_65e6b1853ffd4.jpg)
NEWS15 मराठी रिपोर्ट - पुणे
पुणे शहरातील नागरीकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. शहरात आज दि.05 मार्च पासून कलम 144 लागू करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहारात सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या अनेक घटना समोर आल्या होत्या. त्यातच ड्रग्जचे मोठे रॅकेट समोर आल्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. तर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत मोठे खुलासे करत; कठोर कारवाईचा इशारा दिला होता.
पुणे शहरात कायदे, नियम तसंच न्यायालयीन आदेश यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी 31 मार्चपर्यंत शहरात 144 कलम लागू असणार आहे. शहरातील बार, रेस्टॉरंट, पब आणि रूफटॉप रेस्टॉरंटसाठी या आस्थापनांसाठी हे आदेश जारी करण्यात आला आहे. या आस्थापनांना त्यांचे कामकाज पहाटे 1.30 वाजेपर्यंतच करता येणार आहे. शिवाय वेळेशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचं काटेकोरपणे पालन केलं नाही तर कठोर कारवाई केली जाईल असं पोलीस आयुक्तांनी आदेश दिले आहेत. पुणे शहरातील सर्व हुक्का पार्लर बंद करण्यात येत आहेत. पोलिसांकडून पब्स, रेस्टॉरंटमध्ये हुक्का सेवन आणि विक्री करण्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी तब्बल ४ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले होते. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हॉटेल्स पब्ससाठी नियम
छतावरील आस्थापनांना अल्कोहोल देण्यासाठी विशिष्ट परवाना आवश्यक आहे. तो नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. वयोमर्यादा इत्यादीसह अल्कोहोल सर्व्ह करण्याबाबत अबकारी परवाना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. या आस्थापनांमध्ये लाइव्ह परफॉर्म करणाऱ्या परदेशी नागरिकांची 15 दिवस अगोदर सूचना देणे अनिवार्य असणार आहे. तिकीट परफॉर्मन्ससाठी पोलीस आयुक्त कार्यालयाची पूर्वपरवानगी आवश्यक असणार आहे. प्रवेश, बाहेर पडणे आणि सेवा देणाऱ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य असणार आहे. तसंच डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डरचे दोन संच गरजेचे आहे. इनडोअर म्युझिक परफॉर्मन्स पहाटे 1.30 पर्यंत असेल. आउटडोअर परफॉर्मन्स आणि इव्हेंट्स रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहे.