SBI कर्मचाऱ्यांच्या उद्धट वागणुकीमुळे ग्राहक नाराज...
![SBI कर्मचाऱ्यांच्या उद्धट वागणुकीमुळे ग्राहक नाराज...](https://news15marathi.com/uploads/images/202408/image_750x_66d04b2fa132a.jpg)
प्रतिनिधी - गजू कैलासवार, पाटणबोरी, वणी विभाग
पाटणबोरी येथे नॅशनल बँक एकच असून या बँकेत पाटण बोरी व आजूबाजूच्या परिसरातील अशा 42 गावांचा व्यवहार जोडला गेला आहे. नॅशनल बँक एकच असल्यामुळे खातेदार, महिला गट, निराधार, शेतकरी कर्ज, व्यापारी असे व्यवहार येथे चालत असल्यामुळे बँकेत कायम गर्दीच बघायला मिळते.
सरकारी कर्मचाऱ्यांची यंत्रणा अपुरी असल्यामुळे कामाच्या व्यापाने बँकेचे कर्मचारी सतत वैतागलेले असतात. त्यामुळे येथील ग्राहकांना त्यांच्या बोलीभाषेने उद्धट वागणूक देत असल्याने अनेकदा ग्राहक व कर्मचारी यांच्यात शाब्दिक वादविवाद होतात. आत्ता सद्यस्थितीत लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा सुरू असल्याने योजनेचा लाभ घेण्याकरिता महिलांची गर्दी उफाळली आहे. आधीच महिला शेतातील 300 ते 400 रुपये मजुरी सोडून या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता पायपीट करून येतात.
त्यांना पाच मिनिटाच्या कामासाठी पाच तास बँकेत गर्मीमध्ये तात्काळत उभे राहावे लागते. केवायसी च्या नावाखाली इकडून तिकडे उन्हातानात फेऱ्या माराव्या लागतात. बँकेत ग्राहकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील नाही. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्या उद्धट वागणुकीमुळे ग्राहक त्रस्त आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले असता ते कर्मचाऱ्यांचीच बाजू घेऊन ग्राहकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. या सर्व बाबी लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष घालून कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना चांगली वागणूक मिळावी याची दखल घ्यावी अशी येथील जनतेची मागणी आहे.