डॉ. प्रवीण तोगडिया सोमवारी यवतमाळ दौर्यावर, हिंदू धर्मरक्षा निधी व संघटन बांधणी बाबत दौरा...
NEWS15 प्रतिनिधी : किरण मुक्कावार
यवतमाळ : आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया; सोमवार दि. ६ फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथे येत आहेत. वीर हिंदू विजेता हिंदू असा संदेश देत त्यांनी विदर्भात दौरा सुरु केला असून, आंतर्राष्ट्रीय हिंदू परिषदेची स्थापना केल्यानंतर त्यांचे पहिल्यांदाच यवतमाळ मध्ये आगमन होत आहे.
हिंदू धर्मरक्षा निधी संकलन तसेच संघटना बांधणीच्या दृष्टीने तोगडियांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. डॉ. प्रवीण तोगडिया यांनी प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेऊन देशभरात हिंदू समाज संघटित केला. यवतमाळ मध्ये देखील त्यांनी यापूर्वी केलेल्या दौर्यात अयोध्येत राममंदीर निर्माण, गौहत्या बंदी, शेती व शेतकरी, जनसंख्या नियंत्रण या मुद्यांवर हिंदू समाजात जागृती केली आहे. सोमवारी बोरेले नगर येथील मनीष जयस्वाल यांच्या निवासस्थानी डॉ. तोगडिया यवतमाळ जिल्ह्यातील हिंदू समाजातील गणमान्य व्यक्तींच्या भेटी घेतील. तर मंगळवारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून, ते अमरावतीला प्रयाण करतील. यावेळी त्यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे प्रांत प्रभारी मोतीलाल चौधरी, प्रांत मंत्री संतोष ठाकूर, राष्ट्रीय बजरंग दल प्रांत अध्यक्ष अनुप जायसवाल, राष्ट्रीय महिला परिषद प्रांत अध्यक्ष अस्मिता भट्ट आदींची उपस्थिती राहणार आहे.