पुण्याच्या आंबेगाव शिवारातील जांभूळवाडी तलाव परिसरात, डोक्यात दगड घालून मित्राची हत्या...
प्रतिनिधी - पुणे (ग्रामीण)
पूर्व वैमनस्यातून तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आंबेगाव मधील जांभूळवाडी तलावाच्या बांधावर घडली आहे. तर याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रोहित नामदेव ढमाळ (रा. योगमुद्रा बिल्डींग, भूमकर वस्ती, नन्हे, सिंहगड रोड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
तर याप्रकरणी सूरज गणेश सूर्यवंशी (रा. गणेश पेठ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रोहितचा मित्र दीपक सुखदेव बंडगर (२१, रा. प्रतीक हाईट्स, पारी कंपनीजवळ, नन्हे, सिंहगड रस्ता) याने आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सूरज आणि रोहित हे मित्र आहेत. त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता. शनिवारी (दि.१४) रात्री साडेदहाच्या सुमारास आंबेगाव परिसरात जांभूळवाडी तलाव परिसरात सूरज, रोहित यांच्यात वाद झाला. वादातून सूरजने रोहितच्या डोक्यात दगड घातला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या रोहितला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.