उजनी धरणातून, पंढरपूर आणि सोलापूरसाठी सप्टेंबर'ला पाणी सोडणार... मात्र पिकांना पाणी नाही...

उजनी धरणातून, पंढरपूर आणि  सोलापूरसाठी सप्टेंबर'ला पाणी सोडणार... मात्र पिकांना पाणी नाही...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - प्रविण  मखरे (सोलापूर)

सोलापूर, नगर, पुणे जिल्ह्यांसह धाराशिव शहरासाठी वरदायिनी असलेले उजनी धरण; पावसाळा सुरु होऊन अडीच महिने झाले तरी देखील १३ टक्क्यांवरच थांबले आहे. १५ जून ते २६ ऑगस्ट या काळात धरण अजूनही तळाशीच असल्याने, खरीप पिकांना पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीत होवू शकला नाही. पाणी बचतीसाठी आता पंढरपूर व सोलापूर शहरासाठी एकावेळी साधारणत: २० सप्टेंबरदरम्यान पाणी सोडले जाणार आहे. मात्र, दुसरीकडे शेती सिंचनाच्याबाबतीत ऐन पावसाळ्यात जिल्ह्यावर पाणी टंचाईचे गहिरे संकट निर्माण झाले आहे.

उजनी धरणातून सोलापूर महापालिका, जिल्ह्यातील करमाळा, बार्शी, कुर्डुवाडी नगरपालिका व पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती आणि धाराशिव व नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड या शहरांसह काही एमआयडीसींनाही पाणी दिले जाते. सोलापूर जिल्ह्यातील शेतीसाठी उन्हाळ्यात दोन ते तीन आवर्तने सोडली जातात. अशा पद्धतीने धरणातील पाण्याचा वापर होतो. गतवर्षी उजनी धरण २६ ऑगस्टपर्यंत १०० टक्के भरले होते. यंदा मात्र पावसाअभावी धरण १३ टक्क्यांवरच थांबलेले आहे. त्यामुळे शेतीपेक्षा पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जात आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. पण त्यांनाही आता पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे उजनीत येणारा विसर्ग पूर्णपणे बंद असल्याने ऐन पावसाळ्यात सोलापूरकरांवर पाणीटंचाईचे सावट घोंगावत आहे. 

आठ वर्षांनी परिस्थितीची पुनरावृत्ती.! २००२ मध्ये सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाचे सावट पसरले असताना तत्कालीन पालकमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पुण्यातून उजनी धरणात पाणी सोडले होते. २०१५ मध्ये देखील त्यांनी अशीच मागणी शासनाकडे केली होती. त्यावेळी २३ ऑगस्टपर्यंत उजनी धरणात उणे ६.५० टक्क्यांवर होते. उजनीच्या वरील भागात १९ धरणे असून उजनी हे शेवटच्या टोकाला आहे. पुण्याहून या धरणात पाणी सोडल्यास लगेचच उजव्या व डाव्या कालव्यातून तसेच भीमा-सीना बोगद्यातून पाण्याचे दोन आवर्तने निघू शकतात. उजनीवर दोन लाख हेक्टर शेती अवलंबून असून त्या शेतकऱ्यांना आधार मिळावा म्हणून त्यांचा प्रयत्न होता. आता २०२३ मध्ये अशीच परिस्थिती उद्‌भवली आहे, पण जिल्ह्याचे पालकमंत्री मूळ सोलापूरचे नाहीत आणि जिल्ह्यात सर्वाधिक आमदार सत्ताधारी पक्षाचेच, त्यामुळे त्यांच्याकडे आग्रहाची विनंती कोण करणार, असा प्रश्न आहे.

5 सप्टेंबरला पुन्हा ‘कालवा सल्लागार’ची बैठक जिल्ह्यातील खरीप पिकांसाठी उजनी धरणातून पाणी सोडावे, अशी जिल्ह्यातील बहुतेक आमदारांची मागणी होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. २३) मुंबईत पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कालवा सल्लागार समितीची बैठक घेतली. पण, खरिपासाठी पाणी सोडण्याचा निर्णय त्यावेळी झाला नाही. ५ सप्टेंबरपर्यंत पावसाची स्थिती पाहून पुन्हा बैठक घेऊ असे त्यावेळी ठरले होते. त्याअनुषंगाने ५ सप्टेंबरला पुन्हा बैठक होऊन खरीपाला पाणी सोडण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.