पक्षाने संधी दिली तर; मनसेचा पहिला खासदार मीच असेल.! पहा कोणी केला दावा...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - पुणे
पक्षाने जर संधी दिली तर महाराष्ट्रातला मनसेचा पहिला खासदार आपण असल्याचे वक्तव्य; मनसेचे ब्रॅंड आणि निष्ठावंत नेते वसंत मोरे यांनी केले आहे. मनसे नेते वसंत मोरे यांची अलीकडेच बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रमुख संघटक म्हणून नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीनंतर वसंत मोरे यांनी पक्ष बांधणीसाठी बारामती मतदारसंघातील चारही तालुक्यांचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात त्यांनी ठिकठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठका घेतल्या.
वसंत मोरे यांचा दौरा इंदापूर तालुक्यात आल्यानंतर जंक्शन, निमगाव केतकी व इंदापूर शहरातील टेंभुर्णी नाका या ठिकाणी मोरे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले व या ठिकाणी मनसेच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांनी मोरे यांना आपण पुण्यातून आमदारकीची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात का? असा प्रश्न केल्यानंतर मोरे म्हणाले, मला तर यावर्षी खासदार व्हायचं आहे. पुण्याचा खासदार म्हणून मी सध्या इच्छुक आहे.

माझ्या पक्षाने तसेच राज ठाकरे यांनी जर मला संधी दिली तर यावर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला खासदार वसंत मोरे 100 टक्के असणार, असा विश्वास त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला आहे. निवडणुकीच्या दृष्टीकोनातून काय पाऊल उचलायचं; हे राज ठाकरे ठरवतील. पण बारामती शहरात लवकरात लवकर आम्ही राज ठाकरेंना आणणार आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघाचा पहिला मेळावा बारामती शहरात होईल”, असंही वसंत मोरे म्हणाले.
