हिंगोलीतील कळमनुरी तहसील कार्यालयात दलालांचा सुळसुळाट, प्रशासनाचा कानाडोळा...!
News15 मराठी प्रतिनिधी नारायण काळे
कळमनुरी : हिंगोली जिल्हातील कळमनुरी तहसीलदार कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सर्वच विभागाना दलालानी आपल्या विळख्यात घेतले असुन कर्मचारी त्यांच्या इशारावर शासकीय कामकाज करताना दिसुन येत आहेत.
सर्व सामान्य नागरिकांना विविध शासकीय कागदपत्रे काढण्यासाठी दलालाचा सहारा घ्यावा लागत आहे. पर्यायाने सर्वसामान्याची मोठी आर्थिक लुट होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची या कार्यालयात रोज मोठी वर्दळ असते. प्रत्येकांचे काहीना काही कामे तहसील कार्यालयात असतात. यामुळे कळमनुरी तहसील कार्यालयाला दलालाचे चांगलेच वर्तुळ तयार झाल्याचे दिसून येते. तहसील कार्यालय नेहमीच चर्चेत येत आहे ग्रामीण भागासह शहरातील गोरगरिबांना फसवुन तसेच बेकायदेशीर कामे करून या दलालांनी अनेकांची लुबाडणूक केली आहे. तहसील कार्यालयाच्या रहिवासी दाखल्यापासुन ते जातीच्या दाखला, निराधार श्रावणबाळ अशा विविध योजनासाठी लागणारे कागदपत्रे काढण्यासाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची सही घ्यावी लागते हे दिव्य काम करण्यासाठी संबंधित कर्मचारी चिरिमिरी घेतल्या शिवाय कागदपत्रे पुढे सरकवत नाहीत. त्यात एखाद्या दलाला मार्फत आर्थिक तडजोड झाली तरच कामे पुढे सरकवली जातात. अवघ्या ४० ते ५० रुपयात प्राप्त होणाऱ्या रहिवासी दाखल्यासाठी २०० ते ३०० रुपये मोजावे लागतात.
कमी वेळात काम करुन देण्याचे अमिष दाखवुन लाभार्थ्यांना आपल्याकडे खेचण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणावर या परिसरात घडत आहेत तसेच शासनाच्या सर्व योजना दलालांच्या विळख्यात सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दलालाशिवाय तहसील कार्यालयचे पान ही हालत नसल्याचे दिसुन येते. तहसील कार्यालय अंतर्गत विविध योजनेतील लाभार्थीस तलाठी मंडळ अधिकारी, पोलिस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखल्यासह इतर कागदपत्रासाठी साधारण १०० ते २०० रुपये इतकाखर्च येतो. परंतु या कागदपत्रासाठी दलाल हजारो रूपये घेतात.
तरी या दलालाचा बंदोबस्त करण्याची मागणी सर्व सामान्य नागरिकाकडुन केली जात आहे.