आचारसंहितेचा भंग.!इंद्रायणी थडी जत्रा रद्द करा, राज्य निवडणुक आयोगाकडे तक्रार, जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांचे दुर्लक्ष, तर केंद्रीय निवडणुक आयोगाकडेही तक्रार करणार...!
Newe15 मराठी प्रतिनिधी गणेश मोरे
पिंपरी : कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र, आचारसंहितेत देखील भोसरीच्या गावजत्रा मैदानावर इंद्रायणी थडीचे आयोजन केले आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभेतील मतदारांवर त्या जत्रेचा प्रभाव पडणार आहे. ही जत्रा तातडीने रद्द करा, संबंधित आयोजकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली.
याबाबत राज्य निवडणुक आयोगाकडे तक्रार केली असून केंद्रीय निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार आहे. या तक्रारीकडे पुणे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी दुर्लक्ष केले आहे. काळभोर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, भोसरी येथील गावजत्रा मैदानावर इंद्रायणी थडी जत्रा दि.25 ते 29 जानेवारी 2023 या कालावधीत आयोजित केली आहे. सदरील यात्रेत हजारो नागरिक सहभागी होणार आहेत.
‘इंद्रायणी थडी’ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत भरविली जात आहे. या जत्रेचा चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवर प्रभाव पडून भाजप उमेदवाराला त्याचा फायदा होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये शहरातील चार हजार तरुणांना नोकरी देण्याचे आमिष दाखविले आहे. त्याचा मतदान प्रक्रियेवर परिणाम होवून राजकीय फायदा उमेदवाराला होवू शकतो. इंद्रायणी थडी यात्रेला उद्घाटनाला राजकीय नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.
संपुर्ण पुणे जिल्ह्यात पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. पिंपरी-चिंचवड शहरासह प्रत्येक प्रभागात सुमारे एक हजारहून अधिक होर्डिग्ज लावले आहेत. त्यामुळे आर्दश आचारसंहितेचा भंग होवूनही पुण्याचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
पोटनिवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात लागू असताना भोसरी विधानसभा मतदारसंघ आचारसंहिता नियमावलीतून सूट दिली आहे का? असा प्रश्न उपस्थितीत होत आहे. त्यामुळे राजकीय इंद्रायणी थडी कार्यक्रमाची तातडीने दखल घेवून जत्रा रद्द करावी, आर्दश आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, अशीही मागणी काळभोर यांनी केली आहे.
आचारसंहितेची काटेकोर अमंलबजावणी कधी?
निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल. याकडे विशेष लक्ष द्यावे. कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदार जागृतीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी अधिका-यांना निवडणुक आढावा बैठकीत दिले. दरम्यान, पुणे जिल्ह्यात आचारसंहिता लागू असताना राजकीय नेत्यांचे पोस्टर, होर्ग्डिज, राजकीय मेळावे, विविध कार्यक्रमाकडे निवडणुक विभागाने दुर्लक्ष केले आहे.