BREAKING || राज्यात आता दुचाकी चालकासह मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती, अन्यथा होणार कारवाई

BREAKING || राज्यात आता दुचाकी चालकासह मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती, अन्यथा होणार कारवाई

NEWS15 मराठी - रिपोर्ट - पुणे

रस्ते अपघातामध्ये दुचाकीस्वार व सहप्रवासी (पिलियन रायडर) यांच्या मृत्यू व जखमींचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे विनाहेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या दोघांना हेल्मेट आवश्यक असून, ते नसल्यास कारवाई करण्याचे आदेश राज्याच्या वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त आणि अधीक्षकांना दिले आहेत.

सहप्रवाशांवर 'स्वतंत्र हेड' खाली कारवाई होणार असून, त्यासाठी 'ई चलन' मशिनमध्ये बदल करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांनी पुण्यासह राज्यातील विविध शहरांमध्ये आरटीओ, पोलिस, जिल्हा प्रशासन यांची काही दिवसांपूर्वी संयुक्त बैठक घेतली होती. त्यामध्ये त्यांनी अपघातांचा आढावा घेतला. त्या वेळी त्यांना अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले होते. हेल्मेटचा वापर होत नसल्याचे दिसून आले. त्यांनी हेल्मेटचा वापर करावा, अशा सूचना दिल्या होत्या.

हेल्मेटचा वापर न करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत. 'मोटार वाहन कायदा' १९८८च्या कलम १२८ आणि १२९ च्या तरतुदीप्रमाणे विनाहेल्मेट दुचाकीस्वार व सहप्रवासी यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने दिलेले उद्दिष्ट व सूचनांची माहिती सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी करून घ्यावी, असे अप्पर पोलिस महासंचालकांनी पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.