कर्मवीरांनी रचला सामाजिक क्रांतीचा पाया - डॉ.नारायण पाटील
![कर्मवीरांनी रचला सामाजिक क्रांतीचा पाया - डॉ.नारायण पाटील](https://news15marathi.com/uploads/images/202408/image_750x_66c8964bd4bcf.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
शिक्षण घेण्याचा अधिकार आणि संधी नसल्यामुळे बहुजन समाज पिढ्यान पिढ्या अज्ञान, अंधश्रद्धा आणि रुढी परंपरांच्या विळख्यात अडकला होता. हे ओळखून नाशिक जिल्ह्यात कर्मवीर रावसाहेब थोरात गणपत दादा मोरे आणि डी.आर.भोसले या कर्मवीरांनी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या रूपाने बहुजन समाजासाठी शिक्षणाची गंगा खुली केली त्यामुळेच सामाजिक क्रांती झाली असे प्रतिपादन डॉ.नारायण पाटील यांनी केले.
मविप्र संस्थेच्या वडनेर भैरव येथील महाविद्यालयात समाज दिन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ.पाटील बोलत होते अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप धारराव होते. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात पाटील यांनी महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीची वाटचाल सांगून नाशिक जिल्ह्यात कर्मवीर रावसाहेब थोरात, गणपत दादा मोरे, डी आर भोसले,काकासाहेब वाघ, भाऊसाहेब हिरे,वाघ गुरुजी, अण्णासाहेब मुरकुटे,विठ्ठलराव हांडे, बाबुराव ठाकरे,डॉ.वसंतराव पवार, या कर्मवीरांच्या कार्याचा परामर्श घेऊन त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वसा आणि वारसा जपणे हीच त्यांना मानवंदना आहे असे प्रतिपादन केले.
प्रारंभी समाजध्वजाचे ध्वजारोहण , समाज गीत व कर्मवीरांचे प्रतिमापूजन प्राचार्य आणि उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.प्राचार्य डॉ.महेश वाघ यांनी मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप धारराव यांचा कादवा कारखान्यातील सेवापूर्ती बद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्रा. डॉ.महेश वाघ यांनी सत्कार केला तसेच त्यांच्या सामाजिक कार्यावर आधारित पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
अध्यक्षीय मनोगतातून दिलीप धारराव यांनी कर्मवीरांना अभिवादन करून त्यांचा आदर्श जपण्यासाठी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने सातत्याने त्यागाची भावना ठेवली पाहिजे असे प्रतिपादन केले व्यवस्थापन समिती सदस्य विलास भवर यांनीही समाज दिनानिमित्त कर्मवीरांच्या कार्याचा वारसा जपला पाहिजे असे सांगून दिलीप धारराव यांचे कार्याचा गौरव केला.कार्यक्रमात विद्यापीठ परीक्षेत तसेच क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शिक्षकेतर सेवक,गुणवंत प्राध्यापक यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास प्रा.रामदास महाले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सल्लागार प्रल्हाद मिस्त्री,स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य,नंदादीप फाउंडेशनचे कार्यकर्ते, महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक सेवक तसेच अनेक पालक उपस्थित होते सूत्रसंचालन डॉ.सुदाम राठोड यांनी केले.