आमदार काळेंनी दिलेला शब्द पूर्ण केला, सभागृहात जाऊन पहिला प्रश्न मांडला...!
![आमदार काळेंनी दिलेला शब्द पूर्ण केला, सभागृहात जाऊन पहिला प्रश्न मांडला...!](https://news15marathi.com/uploads/images/202412/image_750x_676443e344d82.jpg)
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
राजगुरुनगर | खेड - आळंदी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळे यांनी पहिल्याच अधिवेशनात सभागृहात मतदारसंघातील गंभीर प्रश्नांना हात घातल्याने मतदार आमदार काळे यांचे आभार मानत आहे. निवडणूक प्रचारादरम्यान आमदार काळे यांनी खेड तालुक्याच्या पूर्व भागाला शब्द दिला होता तो पूर्ण केला. त्याचबरोबर या प्रश्नांसाठी कायमस्वरूपी लढा देणार असल्याची ग्वाही दिली.
खेड तालुक्याच्या पूर्व भागात पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या हालअपेष्टा भोगाव्या लागत आहे. त्या दूर करण्यासाठी मला सभागृहात पाठवा मी तुमचा पाणी प्रश्न सभागृहात गेल्यानंतर मांडून तो सोडवणार असल्याचे आश्वासन दिले होते. एवढंच नाही तर गुळानी (ता. खेड) येथील सटवजी महाराजांची शपथ घेऊन आश्वासन दिले होते की, मला जर तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली तर सभागृहात जाऊन पहिला प्रश्न मी पूर्व भागातील पाण्याचा मांडणार आणि मग बाकीचे प्रश्न मांडणार असा शब्द दिला होता. त्याच अनुषंगाने आमदार काळे यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सभागृहात बोलण्याची संधी मिळताच पहिला प्रश्न पूर्व भागातील पाण्याचा मांडला त्यामुळे मतदारसंघात आमदार काळे यांचे जोरदार कौतुक केले जात आहे.
सभागृहात आमदार बाबाजी काळे बोलायला उभे राहिले आणि त्यांनी खेड तालुक्यातील पूर्व भागात पाण्यापासून वंचित असलेल्या गावांची प्रातिनिधिक स्वरूपात नावे घेऊन या भागात सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली त्याचबरोबर मतदारसंघात तीन-तीन मोठी धरणे असतानाही आमच्या तालुक्यातील शेतकरी मात्र पाण्यासाठी वणवण करत असल्याची व्यथा मांडली. यावेळी सभागृहात पहिल्यांदाच बोलत असताना तालुक्यातील इतर प्रश्नांवर देखील आमदार काळे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
दरम्यान चाकण येथे होत असलेली वाहतूक कोंडी, पश्चिम भागातील पाणीप्रश्न, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधण्यासाठी मागणी केली, मतदारसंघातील रस्त्यांचे प्रश्न, तीनही शहरातील नागरिकरणाचे प्रश्न, हुतात्मा राजगुरूंचे स्मारक, संग्रामदुर्ग किल्ला यांसारख्या अनेक प्रश्नावर भाष्य करून सभागृहाचे लक्ष वेधले.