धान उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच बोनसची रक्कम मिळणार...
![धान उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच बोनसची रक्कम मिळणार...](https://news15marathi.com/uploads/images/202303/image_750x_641e7844ee389.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : साहिल रामटेके
भंडारा : राज्यातील धान उत्पादकांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याचे शिंदे सरकारने ठरविले असतांना; भंडारा जिल्ह्याला १९८ कोटी १५ लाख ९० हजार ४२० रुपये इतकी सर्वाधिक प्रोत्साहन राशी भंडारा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला प्राप्त झाली असल्याने, लवकरच धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहन राशी जमा होणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी २०२२-२३ या खरीप पणन हंगामात केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमी भावाव्यतिरिक्त नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान लागवडीखालील जमिनीनुसार, प्रती हेक्टरी १५ हजार रुपये, २ हेक्टरच्या मर्यादेपर्यंत रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर रक्कम देण्याची घोषणा केली होती. त्याची पूर्तता करीत राज्य सरकारने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम अदा केल्याने, शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भंडारा जिल्ह्यात सुमारे २ लाख ५५ हजार शेतकरी आहेत. यापैकी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर सुमारे १ लाख २७ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामुळे शासकीय अध्यादेशानुसार अशा नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच या प्रोत्साहन राशीचा लाभ मिळणार आहे.