राजकीय आखाडा : नाणेकरवाडी महाळुंगे जिल्हा परिषद गटात एकाच पक्षात इच्छुक संख्या जास्त असल्याने उमेदवारीवरून रस्सीखेच वाढली,तर गटात मीच निवडून येणारचा बोलबाला सुरु..!
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत खेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या सर्वाधिक चर्चेचा जिल्हा परिषद गट म्हणून नानेकरवाडी महाळुंगे जिल्हा परिषद गटाची मोठी चर्चा होताना दिसत आहे. सर्वाधिक सदन नागरिक असणारा जिल्हा परिषद गट म्हणून या गटाकडे बघितले जात आहे. या गटात चाकण औद्योगिक वसाहत येत असल्याने या गटाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
या गटात एकाच पक्षाकडून दोन पेक्षा अधिक उमेदवार इच्छुक असल्याने तिकीट वाटपासाठी पक्ष नेतृत्वापुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या गटात नाणेकरवाडी गावातून युवा चेहरा आणि नाणेकरवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच गणेश विठ्ठल नाणेकर हे उबाठा पक्षाकडून इच्छुक असून त्यांनी तशी तयारीही सुरु केल्याचे दिसून येत आहे. त्यांचा स्थानिक गावांत संपर्क असल्याने तेही निवडणुकीला सामोरे जाणार असा त्यांनी चंग बांधला आहे. याच गटातून खराबवाडी गावातून मोठ्या प्रमाणात उमेदवार इच्छुक असल्याचे दिसून येते. त्यात खराबवाडी गावचे मतदानही सहा हजाराच्या पुढे गेल्याने या गटात कोणताही उमेदवार निवडून येण्यास या गावची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
या गटातून खराबवाडी गावातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून खरेदी विक्री संघाचे संचालक अरुण सोमवंशी,संभाजीराजे खराबी, जीवन खराबी तर सर्व पक्षीय किंवा भाजपाकडून खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती क्रांती सोमवंशी यांचे पती भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष संदीप सोमवंशी यांनीही निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यांनी या अगोदरही दोन वेळा पंचायत समिती निवडणुकीत आपले नशीब आजमावले होते. पण या निवडणुकीत अतिशय क्षुक्ष्म नियोजन आणि जनसंपर्क या जोरावर ते निवडणुकीला सामोरे जाताना दिसत आहेत. या मागील निवडणुकीचा इतिहास बघता खराबवाडी गावात दोन किंवा दोनपेक्षा जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात असतील तर याचा फायदा बाहेरील उमेदवाराला होतो आणि खराबवाडी गावातील सर्व उमेदवार यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागतो. त्यामुळे खराबवाडी गावातील उमेदवार यांना या निवडणुकीत यश संपादन करायचे असेल तर त्यांनी एकत्र बसून एकच उमेदवार द्यायला हवा. पण खराबवाडीत एक पक्ष एक उमेदवार होईल असे काय चित्र सध्या तरी दिसत नाही. याच गटातून राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते आणि खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती चंद्रकांत इंगवले हेही तयारी करत आहेत. त्यांचा राजकीय अनुभव बघता आजूबाजूच्या गावांतील जनसंपर्क बघता तेही निवडणुकीसाठी शड्डू ठोकून रिंगणात उतरले आहेत. त्यांचे खेड कृषी बाजार समिती निवडणुकीत ऐनवेळी तिकीट कापल्याने ते नाराज होते त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना अजित पवार पक्षाकडून उमेदवारी दिली जाऊ शकते.
या गटात काही उमेदवार हे तिकीट मलाच मिळणार आणि मी एवढे कोटी घालणार असा राजकीय वार करताना दिसत आहेत. पण काही उमेदवार हे फक्त पैशाच्या जोरावर जर या गटात निवडणुकीला सामोरे जाणार असतील तर त्यांना यश तर दूर,यशस्वी होण्या अगोदर त्यांचा राजकीय अस्त झाल्याशिवाय राहणार नाही. या गटातून बिरदवडी गावचे माजी सरपंच बाबासाहेब पवार हेही इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यांचे नातेगोते आणि जनसंपर्क बघता ते कुणाच्या तरी विजयात किंवा कुणाचा तरी पराभवास हातभार लाऊ शकतात. याच बरोबर खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार हेही या गटात तयारी करत असून ते शेवट्या क्षणाला भाकरी फिरवल्या शिवाय राहणार नाहीत फक्त ती कुणासाठी फिरवतात हे अजूनही गुलदस्त्यात आहे.
याच गटातील खालुम्ब्रे गावातून युवा नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गणेश बोत्रे यांनी तर जोरदार तयारी केली आहे. त्यांनी मागील दोन –तीन वर्षापासून मतदारसंघ पिंजून काढला आहे आणि त्यांनाच राष्ट्रवादी कॉंगेसचे तिकीट मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांचे संघटना कौशल्य आणि निवडणूक नियोजन बघता तेही निवडणुकीत तगडी फाईट देऊ शकतात. त्याच बरोबर या जिल्हा परिषद गटातून सांगुर्डी गावचे पुणे महानगर प्रदेश विकास महानगर(PMRDA)चे सदस्य वसंत भसे हेही निवडणुकीत आपले नशीब आजमावू शकतात.तर कान्हेवाडीचे निलेश येवले हेही निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.
जिल्हा परिषद निवडणूकीच्या तारखा जाहीर होण्यासाठी अजून महिना दीड महिना लागू शकतो त्या अगोदरच काहीही जोरदार तयारी सुरु केली आहे. अजून निवडणुकीच्या उमेदवाऱ्या, पक्ष,यासाठी मोठ्या घडामोडी घडणार आहेत. त्यामुळ काही उमेदवार यांनी त्यांची राजकीय कसब दाखवून शांतीत क्रांती करण्याची भूमिका घेतली आहे तर काहींनी आम्हीच उमेदवार असणार अशी तयारी सुरु केली आहे. यातून कोणत्या इच्छुक उमेदवार यांना कोणत्या पक्षाचे तिकीट भेटते आणि कोणता उमेदवार निवडणुकीत सरशी घेतो हेच पहावे लागेल.