राजकीय : खेड तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत अरुण सोमवंशी यांची बिनविरोध निवड..!
![राजकीय : खेड तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत अरुण सोमवंशी यांची बिनविरोध निवड..!](https://news15marathi.com/uploads/images/202502/image_750x_67acab762ecb0.jpg)
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत वाडा गटातून कुणाचाही विरोधी अर्ज न आल्याने एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केलेले अरुण बाजीराव सोमवंशी यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विजयाची फक्त औपचारिकता बाकी असून येत्या २७ फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे तालुका खजिनदार असलेले अरुण सोमवंशी यांनी राजकीय खेळी करून आपला उमेदवारी अर्ज वाडा गटातून दाखल करून बिनविरोध निवडून येण्याचा मान मिळविला आहे. अरुण सोमवंशी यांची राजकीय कारकीर्द ही अतिशय संयमी आणि वेळेला राजकीय डाव टाकण्याची राहिली आहे. त्यामुळे त्यांनी खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीचा अर्ज दाखल करताच त्यांनी सर्व मतदारांच्या भेटी गाठी घेऊन राजकीय डाव टाकून कुणी उमेदवारी अर्जंच दाखल करणार नाही याची दक्षता घेतली होती. त्यामुळे वाडा गटातील जागा बिनविरोध होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांचे सर्व पक्षीय नेत्यांकडून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या जात आहे. त्यामुळे ते निवडणूक पार पडल्यावर चेअरमन पदासाठी काय करिष्मा करतात हेही पहावें लागणार आहे.
अरुण सोमवंशी यांनी आता पर्यंत तालुक्यात निष्ठेचे राजकारण केले आहे. त्यांच्यावर कितीही अन्याय झाला तरी, त्यांनी आपल्या नेत्यांवर असणारी निष्ठा कमी न होऊन देता एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला आहे. काही नेते आपल्या स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात जाऊन पदाच्या मोहात पडतात. पण अरुण सोमवंशी यांनी तसे न करता कुणी कितीही टीका करुदेत त्यांनी आपली निष्ठा अबाधित ठेऊन राजकीय काम सुरुचं ठेवले होते. त्यानुसार सबर का फल मिठा होता है यानुसार त्यांना खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीची उमेदवारी मिळाली आणि त्यांनी संधीचे सोने करून दाखवले आहे.
मागील वर्षीचं अरुण सोमवंशी यांच्या स्नुषा क्रांती सोमवंशी यांची खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी निवड झाली होती. त्यातच खराबवाडी गावात सोमवंशी परिवार हा अतिशय संयमी व गावातील सर्वसामान्य नागरिकांशी नाळ जोडलेला परिवार म्हणून ओळखला जातो. या अगोदर अरुण सोमवंशी यांच्या पत्नी योजना सोमवंशी यांनी खराबवाडी गावाचे सरपंच पदही भूषविले आहे. त्यामुळे या घराण्याला राजकारण नवीन नाही. त्यातच गावातचं मोठा गोतावळा असल्याने त्याचा फायदा एकमेकांच्या राजकीय वाटचालीसाठी होतो. अरुण सोमवंशी यांची संचालक पदावर बिनविरोध निवड झाल्याने तालुक्यात योग्य व्यक्तीला न्याय मिळाल्याची भावना कार्यकर्ते, नातेवाईक, मित्र परिवार बोलून दाखवत आहे. अरुण सोमवंशी यांच्या निवडी बद्दल माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या तर्फे खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांच्याकडून सत्कार करण्यात आला. अरुण सोमवंशी यांचे सर्व राजकीय पक्षातील नेत्यांशी सलोख्याचे संबंध असल्याने त्यांना सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या.