राजकीय : २१ डिसेंबरच्या नगरपरिषद निवडणूक निकालावर खेड तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीचे समीकरणे ठरणार?

राजकीय : २१ डिसेंबरच्या नगरपरिषद निवडणूक निकालावर खेड तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीचे समीकरणे ठरणार?

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

खेड : उद्याच्या नगरपरिषद निवडणूक निकालावर पुढे येऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीची राजकीय समीकरणे ठरणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. 

खेड तालुक्यातील सगळे पक्ष उद्याच्या निकालावर अवलंबुन असून उद्याचा निकाल खेड तालुक्याच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीची परेड असल्याचे बोलले जात आहे. सध्याचे तालुक्यातील राजकीय चित्र बघता आमदार उबाठा पक्षाचे असूनही कुठेही तालुक्यात नगरपरिषद निवडणुकीत त्यांना व्यवस्थित राजकीय जुळवा जुळव करता आली नसल्याचे दिसून आले. राजगुरूनगर नगरपरिषदेत सध्याची लढत बघता महायुतीतील अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिंदे शिवसेना अशीच लढत बघायला मिळणार आहे. पुढे जाऊन चाकण नगरपरिषदेतही राजगुरूनगर सारखीच महायुतीतील घटक पक्षातच लढत होणार आहे. आळंदी नगरपरिषदेत भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होताना दिसत आहे. उद्याच्या निकालात कोणत्याही पक्षाचा नगराध्यक्ष झाला तरी त्या यशाचे मानकरी महायुती घटक पक्षच असणार आहे. त्यामुळे कुठे तरी खेड तालुक्यात महायुतीची सरशी होणार हे नकारता येणार नाही. त्या तुलनेत महाविकास आघाडी घटक पक्ष उबाठा पक्षाचे खेड-आळंदि विधानसभेत आमदार असतानाही त्यांना नगरपरिषद निवडणुकीत राजकीय जुळवा जुळव का करता आली नाही? हे न उमगणारे कोडे म्हणावे लागेल.

जर वरील प्रमाणे उद्याचा नगरपरिषदेत निवडणूकीचा निकाल लागला तर पुढे येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत यांचा थेट परिणाम दिसू शकतो. कारण नगरपरिषद हद्दीतील जी शहरे आहेत ती ग्रामीण भागाशी संलग्न आहेत आणि त्याचा थेट परिणाम ग्रामीण भागावरही दिसून येईल यात शंका नाही. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकिसाठी आमदार बाबाजी काळे यांच्याकडे प्रत्येक जिल्हा परिषद गटात अर्धा डजन इच्छुक आहेत. त्यातून एकनिष्ठ आणि लोकांभिमुख चेहरा निवडून त्याला तिकीट देण्याची चुणूक आमदार बाबाजी काळे यांनी वेळ न दवडता निवडणूक जाहीर होताच दाखवली तर त्यांना मोठे यश मिळू शकते. पण त्यांनी फक्त वेट आणि वॉचची भूमिका घेऊन निर्णय घेण्यास उशीर लावला तर त्यांना व त्यांच्या पक्षांवर नगरपरिषद निवडणुकीसारखी नामुष्की ओढवल्या शिवाय राहणार नाही.

त्यासाठी उद्याच्या निकालावर सगळी पुढील निवडणूकीची गणिती अवलंबून आहेत. उद्या जर महायुतीच्या पक्षांची नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेवक पदासाठी सरशी झाली तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीच्या तिकिटासाठीचा त्यांचा राजकीय भाव वाढल्याशिवाय राहणार नाही..