जल जीवन योजनेच्या कामांची चौकशी करा, श्रमजीवी संघटनेची मागणी...

जल जीवन योजनेच्या कामांची चौकशी करा, श्रमजीवी संघटनेची मागणी...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

जल जीवन मिशन,'हर घर नल से जल' या योजनेव्दारे अजूनही प्रत्येक गाव - पाड्यातील प्रत्येक घरात नळाव्दारे पाणी न आल्याने ठेकेदारांना झालेल्या अपूर्ण कामाचे बिल अदा करु नये,या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मुरलीधर कनोजे यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी व तालुका पाणी पुरवठा अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे.

दिंडोरी तालुक्यातील प्रत्येक गावात शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल देण्याचा कार्यक्रम सुरु आहे. ४ सप्टेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार तालुक्यातील प्रत्येक गावातील राहणार्‍या सर्व कुटूंबातील घरात,बंगल्यात, घरकुलात,झोपडीत,झापात नळाने पाणी पुरवठा मिळालेच पाहिजे,अशी योजना आहे.त्यासाठी शासनाने करोडो रुपयाची तरतुद केली असून १५ व्या वित्तआयोग व पेसा मधुन ही पाणी पुरवठासाठी खर्च होणार आहे. सदर योजनेसाठी निधीची कमतरता नसतांना योजना पूर्ण करण्याची मुदत संपली असून अजूनही तालुक्यातील गावात नळाने पाणी पुरवठा झालेला नाही. ग्रामसेवक व पाणी पुरवठा, आरोग्य व स्वच्छता समिती यांनी प्रत्येक घरात,झोपडीत,झापात नळाव्दारे पाणी देण्याची व्यवस्था करायची आहे ती अजूनही झालेली दिसत नाही.शासन निर्णयाप्रमाणे दि. ३१ मार्च २०२४ पुर्वी सर्व कामे पुर्ण करण्याची होती परंतू अजूनही गावातील प्रत्येक कुटूंबातील घरांना नळ जोडणी झालेली नाही. या जल जीवन मिशन योजनेतील पहिल्या व दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यातील कामे अजूनही अर्धवट आहेत.तरी या कामाची सखोल चौकशी व्हावी,अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष मुरलीधर कनोजे,शामराव बोरस्ते,बंडू भुसारे,बापू बोंबले,योगेश चौधरी, आप्पा बोरस्ते,सोमनाथ जगताप, अरमान खान आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.