मंडल अधिकार्‍यांची बघ्याची भुमिका; उपोषणाचा इशारा.! सोनजांब येथे बेकायदेशिर उत्खनन

मंडल अधिकार्‍यांची बघ्याची भुमिका; उपोषणाचा इशारा.! सोनजांब येथे बेकायदेशिर उत्खनन

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील सोनजांब येथील सरकारी जागेवर अवैधपणे बेकायदेशिर उत्खनन होवून शासनाचा कोट्यावधींचा महसूल बुडत आहे. संबंधित अधिकार्‍यांना निदर्शनास आणून देवून देखील बघ्याची भुमिका घेत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी संबंधितांवर कारवाई व्हावी,या मागणीचे निवेदन तहसिलदार मुकेश कांबळे यांना दिले आहे. 

सोनजांब येथील गट नं.५०९ हा साधारणत: ५ हेक्टरचा सरकारी गट आहे.या गटातून बेकायदेशिरपणे मुरुम उत्खनन केले जात आहे. दिवसाढवळ्या ट्रॅक्टर,जेसीबी आदी यंत्रांच्या साह्याने बेकायदेशिरपणे मुरुम वाहतूक केली जाते.यासंदर्भात मंडल अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार करण्यात येवूनही त्यांनी आतापर्यंत सोयीस्कर डोळेझाक केली असल्याची तक्रार सोनजांब येथील ग्रामस्थ करीत आहेत. संबंधित मंडल अधिकारी यांना पुरावे देवूनही संबंधित मंडल अधिकारी याची दखल घेवून संबंधितांवर कारवाई का करत नाही? असा सवाल ग्रामस्थ विचारत आहे. मंडल अधिकार्‍यांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी तहसिलदारांना निवेदन देत संबंधित बेकायदेशिर गौण खनिज उत्खननाची चौकशी करावी,अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

तसेच आवश्यक ती चौकशी करुन यात संबंधित प्रशासकीय अधिकारी दोषी आढळत असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली असून  लवकरात लवकर  कारवाई करावी अन्यथा पुृढील आठवड्यात सोनजांब ग्रामस्थांच्यावतीने आमरण उपोषण करण्यात येईल,असा इशारा ग्रा.पं. सदस्य प्रभाकर जाधव,राजेंद्र जाधव, भास्कर बस्ते,तुळशीराम जाधव, प्रकाश जाधव आदींनी दिला आहे. 

सरकारी जागेवर दिवसाढवळ्या यंत्रांच्या साह्याने बेकायदेशिर उत्खनन होत असल्याने मंडल अधिकार्‍यांना निदर्शनास आणून देवून देखील त्यांनी सोयीनुसार डोळेझाक केली आहे. शासनाचा लाखोंचा महसूल बुडत असतांना संबंधित अधिकारी बघ्याची भुमिका घेत असल्याने शंका उपस्थित होते. तरी वरिष्ठ पातळीवरुन दखल घेवून आम्हाला न्याय द्यावा.

 प्रभाकर जाधव - सदस्य,ग्रामपंचायत सोनजांब